Nashik Zilla Parishad : 30 जूननंतर बदल्या होणार का? अधिकार्‍यांना लागली चिंता | पुढारी

Nashik Zilla Parishad : 30 जूननंतर बदल्या होणार का? अधिकार्‍यांना लागली चिंता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्य सरकारच्या अस्थिरतेमुळे 30 जूननंतर बदल्या होणार की नाही, याची चिंता प्रशासनातील अधिकार्‍यांना सतावत आहे. मुख्यमंत्र्यांनी या महिन्यात 30 जूनपर्यंत सर्व बदल्या थांबवल्या होत्या. आता राज्यातील अस्थिरता बघता 30 जूननंतर बदल्या होणार की नाही याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे.

सरकारी कर्मचारी, अधिकारी यांची बदल्यांची प्रक्रिया जिल्हा परिषदेतील काही वर्ग एक व दोनच्या अधिकार्‍यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला असून, काहींचा पूर्ण होणार आहे. यामुळे त्यांनी बदलीसाठी प्रयत्न केले होते. त्यानुसार सर्व काही जुळवूनही आणले होते. मात्र, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदारांची नाराजी व्हायला नको म्हणून राज्यातील महाविकास आघाडी सरकारने 30 जूनपर्यंत बदल्या न करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे जुलैमध्ये बदल्या होतील, असे वाटत असतानाच राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. शिवसेनेनेच दोन तृतीयांशपेक्षा अधिक आमदारांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची भूमिका घेतली असून, शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यास विरोध केला आहे. यामुळे राज्यातील सरकार अस्थिर झाले असून, या अस्थिर परिस्थितीत सरकारी कर्मचारी, अधिकार्‍यांच्या बदल्या होणार किंवा नाहीत, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

राजकीय अस्थिरतेने अधिकारी विवंचनेत
वर्ग दोनच्या काही अधिकार्‍यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला असल्याने त्यांनी सोयीच्या ठिकाणी बदली करण्यासाठी प्रयत्न केले होते त्याप्रमाणे जुळूनही आले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर बदल्या स्थगित झाल्या. त्यानंतर आपली बदली होणार, असे वाटत असतानाच राजकीय अस्थिरता निर्माण झाल्याने हे अधिकारी विवंचनेत आहेत.

Back to top button