नाशिक (सिडको) : आयमा, महापालिका व एमआयडीसी संयुक्तरित्या करणार नालेसफाई | पुढारी

नाशिक (सिडको) : आयमा, महापालिका व एमआयडीसी संयुक्तरित्या करणार नालेसफाई

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

अंबड औद्योगिक वसाहतीत पावसामुळे नाले तुंबू नये तसेच सांडपाणी रस्त्यावर येऊन अनेक कंपन्यांमध्ये पाणी शिरते. अनेक कंपन्यांच्या आवारामध्ये हे पाणी जाते. वाहतूक आणि जनजीवनावर त्याचा कोणताही परिणाम होऊ नये यासाठी अंबड इंडस्ट्रियल अंड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (आयमा), महानगरपालिका आणि एमआयडीसीतर्फे मंगळवार (दि. 21जून) पासून संयुक्तरित्या स्वच्छता अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ आणि बीओटी चेअरमन धनंजय बेळे यांनी दिली.

अंबड औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांचे ज्वलंत प्रश्न आठ दिवसात सोडविण्याचे आश्वासन महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी आयमाच्या शिष्टमंडळास नुकतेच दिले होते.त्यानंतर सिडकोचे विभागीय अधिकारी मयूर पाटील यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेचे उपअभियंता हेमंत पठ्ठे,कनिष्ठ अभियंता सूर्यकांत सूरकर,सहाययक अभियंता हेमंत भालेराव यांना तातडीने आयमाच्या पदाधिकाऱ्यांनी संपर्क साधला.यानंतर महापालिकेचे अधिकारी व आयमाच्या पदाधिकाऱ्यांनी औद्योगिक वसाहत परिसरात जेथे कचरा व पालापाचोळा साचून नाले तुंबले जातात त्या भागाची पाहणी केली.

आयमाच्या पदाधिकाऱ्यांनी जेथे नाले तुंबले जातात अशी बारा ठिकाणे महापालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली तसेच अनेक ठिकाणी कचराकुंड्या झाल्या असून तो परिसरही स्वच्छ करावा आणि अंबड औद्योगिक वसाहत परिसरात सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी केली. यावर विभागीय अधिकारी मयूर पाटील यांनी लवकरात लवकर सर्व प्रश्न मार्गी लागतील असे आश्वासन दिले. सामूहिकरित्या प्रयत्न केल्यास हा परिसर सदैव चकाचक राहील या उद्देशाने मंगळवार (दि.21 जून) पासून अंबड औद्योगिक परिसरात आयमा आणि महापालिकेतर्फे संयुक्तरित्या स्वच्छता अभियान राबविण्याचा निर्णय झाल्याचे पांचाळ व बेळे यांनी सांगितले. एमआयडीसीचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब झाज्जे यांच्याशी चर्चा झाली. एमआयडीसीचे कार्यकारी अधिकारी जयंत बोरसे यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी स्वच्छता अभियानात एमआयडीसीचा सक्रिय सहभाग राहील असे आश्वासन दिले. पाहणी दौऱ्यात आयमाचे कोषाध्यक्ष राजेंद्र कोठावदे, सचिव गोविंद झा,  माजी अध्यक्ष राजेंद्र अहिरे, कुंदन डरंगे, मूलभूत सुविधा समितीचे कार्याध्यक्ष हेमंत खोंड आदी सहभागी झाले होते.

Back to top button