

किशोर खंडागळे :
ताथवडे : खासगी स्कूल बसचालकांनी यावर्षी दरवाढ केल्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. आधीच कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या नागरिकांना या दरवाढीचा चांगलाच फटका बसला आहे.
कोरोनामुळे राज्यातील शाळा जवळपास दोन वर्ष बंद होत्या. त्यामुळे स्कूल बसही बंद ठेवाव्या लागल्या. आता राज्य सरकारने कोरोनाचे सर्व निर्बंध शिथिल करुन शाळा पुन्हा सुरळीत सुरू केल्या आहेत. परंतु, बस चालकांनी साधारण 40 टक्के दरवाढ केली आहे. कोरोनापूर्वी दर महिना 500 रुपये प्रति मुलाकडून घेतले जात होते. ते आता 700 ते 800 रुपये घेतले जात आहे.
ताथवडे व पुनावळेमध्ये अनेक नामांकित शाळा आहेत. या परिसराला एक शैक्षणिक हब म्हणूनही ओळखले जाऊ लागले आहे. गेल्या आठवड्यापासून येथील शाळा चालू झालेल्या आहेत. पालक आपल्या पाल्याला उज्ज्वल भविष्य देण्यासाठी या नामांकित शाळेत पाठवितात. आपल्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या खिशाला कात्री लावतात.
भल्यामोठ्या फीबरोबरच शाळेतील इतर खर्च आणि आता शाळेतील स्कूल बसमध्ये झालेल्या भाडेवाढीमुळे पालकांची तारांबळ उडत आहे. काही नामांकित शाळेत त्यांचीच बससेवा असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने ते बंधनकारक केली आहे. परंतु, सुरक्षेच्या उपायांचा विचार करण्याऐवजी परवडेल तेच पाहण्याकडे पालकांचा कल असल्याने बस घेणार्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याचेही सध्याचे चित्र ताथवडे व पुनावळेतील शाळेमध्ये दिसून येत आहे. खासगी व्हॅन चालक आपली वाहने जास्त वेगाने व मद्य प्राशन करून चालवित असल्याच्याही घटना घडल्या आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.
मुलांना सोडण्याासाठी दुचाकीचा वापर
ताथवडे व पुनावळेतील बहुतांश पालक हे परराज्यातील आहेत. दरवाढ परवड नसल्यामुळे अनेक पालक आपल्या पाल्याला ने-आण करण्यासाठी स्वतःच्या दुचाकीचा वापर करत आहेत. तसेच, काही पालक ओला, उबेर अशा सुविधांचा लाभ घेताना दिसत आहे. तर, काही सोसायटीतील पालकांनी मुलांसाठी महिना परवडेल, अशी खासगी रिक्षा लावली आहे. अनेक पालकांनी दरवाढ कमी करण्याची मागणी केली आहे.