Nashik : यंदा 360 मे. टन आंबा अमेरिकेत, लासलगावला विकिरण प्रक्रिया | पुढारी

Nashik : यंदा 360 मे. टन आंबा अमेरिकेत, लासलगावला विकिरण प्रक्रिया

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा
चवीला उत्कृष्ट असल्याने भारतातील आंब्यांना परदेशात मोठी मागणी असून, कोकणच्या हापूस आंब्याची परदेशवारीही 12 एप्रिलपासून लासलगावमार्गे सुरू झाली आहे. या हंगामात 360 मेट्रिक टन आंब्यावर विकिरण प्रक्रिया करून न्यूयॉर्क, कॅलिफोर्निया, सॅन फ्रान्सिस्को, लॉस एंजेलिस, शिकागो या ठिकाणी आंबा निर्यात झाला आहे.

मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे परदेशात शेतीमालाच्या निर्यातीवर परिणाम झाला होता. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने हापूस आंब्याची यशस्वी निर्यात अमेरिकेत सुरू आहे. लासलगाव येथील भाभा अणु संशोधन केंद्रातून अल्फान्सो, केशर, बदाम, राजापूर, मल्लिका, हिमायत, हापूस या जातीच्या आंब्यांवर विकिरण प्रक्रिया होऊन 360 मेट्रिक टन आंबे अमेरिकेला रवाना झाले आहेत.

किरणोत्सर्ग स्रोत फूड प्रोसेसिंग देशातील चार प्रमुख यंत्रणांना उपलब्ध करून दिले जात असून, यामध्ये नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, गुजरातमधील वापी आणि अहमदाबाद तसेच कर्नाटकमधील बंगळुरू येथील केंद्रांचा समावेश आहे. प्रक्रिया करून आंबे विमानाने पाठवले जात आहेत. यात पहिल्यांदा भारतीय केशर आंब्याची समुद्रामार्गे परदेशवारीही करण्यात यश आले आहे.

  • गतवर्षीच्या तुलनेत निर्यातीत घट

2019 च्या तुलनेत आंबा निर्यातीत 325 मे. टनने घट झाल्याचे दिसत आहे. यंदा ऑस्ट्रेलियामध्ये आंबा निर्यात न झाल्याने निर्यातीत घट झाल्याचे दिसत आहे. भारतामध्ये विविध प्रकारच्या आंब्यांच्या जाती असून, त्यांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते व इतर देशांना निर्यातदेखील मोठ्या प्रमाणात होते.

2007 पासून अमेरिकेला निर्यात….

वर्ष निर्यात               (टन)
2007                      157
2008                      275
2009                      121
2010                      96
2011                      85
2012                      210
2013                      281
2014                      275
2015                       328
2016                       560
2017                       600
2018                       580
2019                       685
2020 आणि 2021
कोरोना काळात निर्यात झाली नाही
2022                       360

हेही वाचा :

Back to top button