SSC Result 2022: दहावीचा निकाल जाहीर, 96.94 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण; यंदाही मुलींची बाजी | पुढारी

SSC Result 2022: दहावीचा निकाल जाहीर, 96.94 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण; यंदाही मुलींची बाजी

पुढारी ऑनलाईन: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मार्च 2022 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यातल्या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात आली. एकूण 96.94 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

दहावीमध्ये 97.96 टक्के मुली यावर्षी उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण हे 96.06 टक्के इतकं आहे. परीक्षा देणाऱ्या मुलांपेक्षा 1.09 टक्के जास्त मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.

यंदा राज्यात 15 लाख 68 हजार 977 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी 15 लाख 21 हजार 003 एवढे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात निकालाची सर्वाधिक टक्केवारी कोकण विभागाची आहे. कोकण विभागातील 99.27 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सर्वात कमी निकाल नाशिक विभागाचा लागला आहे. नाशिक विभागातून 95.90 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे यावर्षी घेण्यात आलेल्या दहावीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आली. गेल्या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे परीक्षा घेण्यात आली नव्हती. पण यावर्षी कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यानं दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. राज्यात दहावीच्या परीक्षेसाठी 16,38, 964 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी 8,89, 506 मुलं असून मुलींची संख्या 7, 49, 458 एवढी आहे.

कुठे पाहाल निकाल?

maharesult.nic.In
hscresult.mkcl.Org
msbshse.co.in या संकेतस्थळावर.

(बातमी अपडेट होत आहे)

Back to top button