नाशिकरोड कारागृहात रंगली भजनस्पर्धा ; बंदिजन झाले दंग | पुढारी

नाशिकरोड कारागृहात रंगली भजनस्पर्धा ; बंदिजन झाले दंग

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
अध्यात्म व प्रबोधन हा समाज परिवर्तनाचा गाभा आहे. अभंग-भजन स्पर्धेमुळे बंदिजनांच्या मानसिकतेवर सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून येईल, असा विश्वास नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक प्रमोद वाघ यांनी व्यक्त केला.

शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त बंद्यांसाठी संत तुकाराम महाराज राज्यस्तरीय अभंग व भजन स्पर्धा घेण्यात आली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया, उपाध्यक्ष नंदकुमार बंड, जिल्हाप्रमुख किरण सानप, वरिष्ठ तुरुंगाधिकारी अशोक मालवाड, कारागृह गुरुजी हेमंत पोतदार, उद्योजक चंद्रकांत बोरसे, आनंद देवतरसे, अच्युत महाराज कुलकर्णी आदी उपस्थित होते. कमलाबाई रसिकलाल धारीवाल यांच्या स्मरणार्थ संघांना दिना आणि प्रकाश धारीवाल यांच्या हस्ते हार्मोनियम, तबला, पखवाज, दहा जोड टाळ, तुकोबांच्या अभंगाची पाच फूट बाय पाच फूट आकाराची फ—ेम व प्रेरणादायी 82 पुस्तकांचा संच देण्यात आला. महाअंतिम फेरीत प्रथम क्रमांक पटकाविणार्‍या संघाला ज्ञानोबा-तुकाराम करंडक आणि प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज करंडक, तर तृतीय क्रमांकाला संत शेख महंमद करंडक देण्यात येणार आहे.

बंदिजनांसाठी विविध उपक्रम आयोजित करण्याची संधी प्रतिष्ठानला मिळावी. आतापर्यंत 15 कारागृहांतील वातावरण पाहिल्यानंतर मनाला शांती देणारा, ऊर्जा देणारा हा उपक्रम असाच कायम सुरू राहावा, अशी अपेक्षा आहे.
– लक्ष्मीकांत खाबिया, शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान, अध्यक्ष

बंदिजन म्हणतात…

स्पर्धेनिमित्त विठ्ठलाचे नामस्मरण केल्याने मनाला मोठी शांतता मिळाली आहे. नामस्मरणातून मिळालेले समाधान हे आयुष्यभर कायम राहील.
-इक्रम पठाण, बंदी

कारागृहामध्ये संतांच्या नामाचे स्मरण हा बंदिजनांसाठी अविस्मरणीय योग आहे.
– भगवान सोळंकी, बंदी

कारागृहामध्ये सातत्याने भजनांचे कार्यक्रम होत आहेत. या आध्यात्मिक उपक्रमामुळे विठ्ठलाची भक्ती करण्याचा चांगला मार्ग मिळाला आहे.
– केशव पवार, बंदी

हेही वाचा :

Back to top button