भारताचे आता ‘मिशन इंग्लंड’, पण कसोटीला केएल राहुल मुकण्याची शक्यता | पुढारी

भारताचे आता ‘मिशन इंग्लंड’, पण कसोटीला केएल राहुल मुकण्याची शक्यता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था; हिटमॅन रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ गुरुवारी (दि.16) इंग्लंड दौर्‍यावर रवाना होणार आहे. फलंदाज रोहित शर्मा, विराट कोहली, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हे मुंबईतच असून, मोहम्मद शमी, केएस भरत आणि चेतेश्वर पुजारा हे मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र, केएल राहुल या संघासोबत जाण्याची शक्यता कमीच आहे. या दौर्‍यात भारतीय संघ यजमान इंग्लंडविरुद्ध 1 कसोटी, 3 वन-डे आणि 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संघाची पहिली तुकडी गुरुवारी इंग्लंडला रवाना होईल. या संघासोबत एनसीएचे काही सदस्य असतील, तर दुसरी तुकडी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेली मालिका संपल्यानंतर रविवारी (दि.19) बंगळूरहून इंग्लंडला रवाना होईल. गेल्यावर्षी भारतीय संघासाठी चार्टर्ड विमानाची सोय करण्यात आली होती; पण यावेळी तसे करण्यात आलेले नाही.

दरम्यान, इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी सर्व खेळाडूंची दोनवेळा आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येईल. अहवाल निगेटिव्ह आला तरच संबंधित खेळाडूला इंग्लंडला पाठविण्यात येईल. याशिवाय इंग्लंडला पोहोचल्यानंतर खेळाडूंची पुन्हा आरटीपीसीआर टेस्ट होईल. त्यानंतरच खेळाडू लिस्टरसाठी रवाना होतील.

24 जूनपासून सुरू होणार्‍या सराव सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी छोटेसे सराव शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड, विकेटकिपर ऋषभ पंत आणि केएल राहुल हे दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी-20 मालिका संपल्यानंतरच इंग्लंडला रवाना होणार आहेत. मात्र, केएल राहुलबाबत संशय निर्माण झाला आहे.

कसोटीला राहुल मुकण्याची शक्यता

भारताचा सलामी फलंदाज केएल राहुल हा सध्या दुखापतीमुळे त्रस्त असल्याने इंग्लंडविरुद्ध होणार्‍या कसोटी सामन्यास मुकण्याची शक्यता आहे. मांडीला झालेल्या दुखापतीमुळे राहुलला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या टी-20 मालिकेतूनही माघार घ्यावी लागली. यामुळे ऋषभ पंतवर संघाची जबाबदारी सोपविण्यात आली. दुखापतीमधून सावरण्यास वेळ लागणार असून राहुलला फिटनेस टेस्ट द्यावी लागण्याची शक्यता आहे. मात्र, हा फलंदाज वेळेत तंदुरुस्त होण्याची शक्यता कमीच आहे.

Back to top button