Nashik : जादा दराने खते विक्री करणार्‍यांवर कारवाई करा ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश | पुढारी

Nashik : जादा दराने खते विक्री करणार्‍यांवर कारवाई करा ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जादा दराने खतविक्री तसेच लिंकिंग करणार्‍या कृषी निविष्ठा केंद्रांवर कठोर कारवाई करावी, असे आदेश जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी कृषी विभागाला दिले आहेत. तसेच खरिपाचा हंगाम बघता नाशिकरोड येथील रेल्वे मालधक्क्यावरील गुदामे हे खते व बियाण्यांसाठी आरक्षित करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी (दि.14) जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेत खरीप हंगाम आढावा बैठक पार पडली. खत कंपन्यांनी त्यांना दिलेल्या आवंटनाप्रमाणे जिल्हाला खतांचा पुरवठा करण्याच्या सूचना गंगाथरन डी. यांनी केल्या. या बैठकीनंतर जिल्हाधिकार्‍यांनी रेल्वे मालधक्का येथे भेट देऊन पाहणी केली.

या भेटीप्रसंगी खरिपाचा हंगाम विचारात घेऊन खतांच्या रेकला प्राधान्य देताना त्या वेळेत खाली करण्याबाबत माथाडी कामगारांना सूचित करावे. तसेच मालधक्का येथील गुदाम खतांसाठी आरक्षित ठेवावे, असे सांगितले.
याप्रसंगी जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. अरविंद नरसीकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, कृषी विकास अधिकारी रमेश शिंदे, अभिजित जमधडे, रेल्वेचे अधिकारी कुंदन महापात्रा, कामगार उपआयुक्त विवेक माळी, खत कंपनीचे अनावकर, एन. एन. पवार, आर. एन. जांभूळकर, रेल्वे ट्रान्स्पोर्टर आनंद शम्मी आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button