नाशिकमध्ये स्मार्ट कंपनी राबविणार ‘सागरमित्र’ अभियान, काय आहे ‘हे’ अभियान? | पुढारी

नाशिकमध्ये स्मार्ट कंपनी राबविणार ‘सागरमित्र’ अभियान, काय आहे 'हे' अभियान?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
प्लास्टिकचा दैनंदिन होणारा वापर आणि त्यामुळे निर्माण होणारा कचरा व प्रदूषणावर मात करण्यासाठी पुणे महापालिकेच्या सहयोगाने शहरात ‘सागरमित्र’ हे अभियान राबविण्यात येणार असून, या अभियानंतर्गत गोदावरी नदीतील ऑक्सिजनची पातळी दर आठवड्याला मोजण्यात येऊन उपाययोजना केल्या जाणार आहेत.

नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी कंपनीतर्फे द अकॅडेमिक अ‍ॅडव्हायझर या पुणे येथील संस्थेतर्फे पुणे महापालिकेच्या सहयोगाने सुरू असलेल्या ‘सागरमित्र’ या प्रकल्पाची माहिती देण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे, घनकचरा विभागाचे संचालक आवेश पलोड, मनपा शिक्षण विभागाचे प्रतिनिधी संतोष आंबेकर, नमामि गोदाचे राजेश पंडित, चंद्रकिशोर पाटील तसेच स्मार्ट सिटी कंपनीचे विविध विभागांत शिकत असलेले प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांच्या जन-जल-जोडो अभियानाचा भाग म्हणून सागरमित्र संस्था पुणे यांची नॉलेज पार्टनर म्हणून निवड करण्यात आली आहे. दैनंदिन जीवनात वाढत असेलेला प्लास्टिकचा वापर आणि त्याचा नदी-समुद्रातील परिसंस्थांवर होत असलेला वाईट परिणाम याची माहिती विनोद बोधनकर यांनी दिली. रामवाडी पुलाजवळील गोदापार्क येथे पाण्यातील ऑक्सिजनची पातळी जागेवरच किटच्या मदतीने कशी मोजली जाते याच्या प्रात्यक्षिकासह ऑक्सिजनचे महत्त्व त्यांनी सांगितले.

सागरमित्र अभियानाची नाशिकमध्ये लवकर सुरुवात करणे आणि गोदावरी नदीच्या पाण्यातील ऑक्सिजन पातळी प्रत्येक आठवड्याला मोजण्याकामी करावयाच्या नियोजनाबाबत चर्चा होऊन कार्यशाळेचा समारोप करण्यात आला.

हेही वाचा :

Back to top button