‘सर्जा राजा’चा सण उत्साहात | पुढारी

‘सर्जा राजा’चा सण उत्साहात

कोल्हापूर पुढारी वृत्तसेवा: शेतकर्‍यांचा सखा असलेल्या सर्जा राजाप्रती आदरभाव व्यक्‍त करणारा बेंदूर हा सण शहर आणि परिसरात पारंपरिक आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. कृषी संस्कृतीमध्ये बैलांबद्दल कृतज्ञता व्यक्‍त करण्यासाठी या सणाचे महत्त्वाचे स्थान आहे. सकाळीच बैलांना आंघोळ घालून त्यानंतर दुपारी बेगड, झूल, रंग, शिंगांना बेगड, बाशिंग, फुगे, हिंगुळ आदी साहित्याने बैलांना सजवण्यात आले. सायंकाळी गावातून बैलांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशा, बँड आणि फटाक्यांच्या आतषबाजीत ही मिरवणूक लक्षवेधी झाली.

भारतीय परंपरेनुसार शेतीसाठी सहाय्यभूत ठरवणार्‍या बैलांची पूजा करण्यात आली. शहरातही पेठांमधून बेंदूर सणाचा उत्साह दिसून आला. पंचगंगा नदी काठाहून बैलांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. बैलांचे पूजन करून त्यांना गोडाचा नैवेद्य खाऊ घालण्यात आला. घरोघरी पिंपळाच्या पानाची तोरणे बांधण्यात आली होती. गळ्यात कवड्याची आणि घुंगराच्या माळा, नवी वेसन, नवा कासरा, पायात करदोड्याचे तोडे घातलेल्या बैलांचे सुंदर रूप डोळ्यात साठवून ठेवण्यासारखे दिसत होते.

घरी आल्यावर घरच्या स्त्रियांनी बैलांचे औक्षण केले. त्यांना पुरण वरणाचा नैवेद्य, कडबा खाऊ घातला. शेतीच्या कामापासून बैलांना विश्रांती देण्यात आली. अनेक गावांमध्ये कर तोडण्याचा पारंपरिक कार्यक्रम झाला. ग्रामीण भागासह शहरातील पेठांमधील अनेक कुटुंबात तसेच शहरालगत असलेल्या बावडा, भोसलेवाडी, कदमवाडी, पाचगाव आदी भागातही बेंदूर सण परंपरेनुसार साजरा झाला.

हेही वाचा

Back to top button