ट्रान्स हार्बरचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण | पुढारी

ट्रान्स हार्बरचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : शिवडी न्हावा शेवा ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाने आणखी एक महत्वाचा टप्पा पूर्ण केला आहे. या प्रकल्पातील पॅकेज 3 च्या मुख्य भूभागावर शेवटचे फाउंडेशन काँक्रीटीकरण पूर्ण करण्यात आले. या टप्प्यात तब्बल 225 फाउंडेशन उभारण्यात आले आहेत.

या प्रकल्पाचे तीन टप्पे करण्यात आले आहेत. तीन टप्यात मिळून आतापर्यंत 76 टक्के काम पूर्ण झाले आहे. शिवडी येथील सहा आंतरबदलापैकी पोहोचमार्गाचे काम पूर्ण झाले आहे. तसेच या पोहोचमार्गापासून मूळ पुलाच्या 4 किमी अंतराच्या गाळ्यांचे डेक स्लॅबपर्यंत काम पूर्ण झाले आहे. या पोहोच मार्गामुळे मूळ पुलापर्यंत बांधकाम साहित्याची ने आण करणे सुलभ झाले आहे.

या पुलासाठी 1089 खांब उभारण्यात येणार असून 800 पेक्षा जास्त खांब बांधण्याचे काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पासाठी समुद्रामध्ये मोठे डेकही उभारले गेले आहेत. त्यामुळे मोठ्या जहाजांना या डेकखालून वाहतूक करणे शक्य होणार आहे. अशा प्रकारे 32 डेक उभारून पुलाचे काम पूर्ण केले जाणार आहे. या डेकची बांधणी जपान, दक्षिण कोरिया, तैवान, व्हिएतनाम आणि म्यानमार या देशांमध्ये करण्यात आले आहे.

हे डेक प्रकल्पस्थळी नेण्यासाठी कारंजा येथे जोडणी यार्ड तयार करण्यात आले असून तेथे या डेकची जोडणी करून ते समुद्रात नेले जातील. हे डेक वाहून नेण्यासाठी खास मोठाले बार्ज तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे वाहतूक जलद करणे शक्य झाले आहे.

Back to top button