Nashik : पावसाळ्याच्या दृष्टीने रस्त्यांसंदर्भात भुजबळांचे यंत्रणांना निर्देश | पुढारी

Nashik : पावसाळ्याच्या दृष्टीने रस्त्यांसंदर्भात भुजबळांचे यंत्रणांना निर्देश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक – मुंबई महामार्गाची पावसाळ्यात अत्यंत दुर्दशा होत असते. या मार्गावरील रस्ते निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे जनतेला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. या रस्त्यांच्या सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी रस्त्यांची प्रलंबित कामे तत्काळ पूर्ण करून पावसाळ्याच्या द़ृष्टीने संपूर्ण तयारी करावी, असे निर्देश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले.

ना. भुजबळ यांच्या मंत्रालयातील दालनात राष्ट्रीय महामार्ग क्र. 3 गोंदे ते वडपे आणि वडपे ते ठाणे या रस्त्याची दुरवस्था, वाहतूक कोंडीच्या उपाययोजनांबाबत मंगळवारी (दि.7) बैठक आयोजित केली होती. या बैठकीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे नाशिकचे व्यवस्थापक बी. एस. साळुंखे, वाहतूक व्यवस्थापक डी. आर. पटेल, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अभियंता आर. ए. डोंगरे, मुंबई नाशिक एक्स्प्रेस वे लिमिटेडचे व्यवस्थापक ए. एस. सुमेश, वसुंधरा यावेळी उपस्थित होते.

ना. भुजबळ म्हणाले, सर्व रस्ते वाहतूक तसेच कार्यान्वयीन यंत्रणांनी आपल्या कामांत समन्वय ठेवावा. वडपे ते ठाणे या परिसरात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. स्थानिक यंत्रणांनी आपल्या कार्यक्षेत्रातील कामांची स्वत: पाहणी करत कामांना तत्काळ गती द्यावी. वारंवार खराब होणार्‍या रस्त्यांचे काँक्रिटीकरण करावे. जेणेकरून वाहतूक विनाअडथळा कोंडीशिवाय सुरळीत सुरू राहील.

आगामी 10 वर्षांत होणारे रस्ते तसेच या परिसरातून करण्यात येणार्‍या रस्त्यांचे नियोजनदेखील सर्व रस्ते विकास यंत्रणांनी आत्तापासून करावे. जेणेकरून या परिसरातून होणार्‍या वाहतुकीचे नियोजन सुयोग्यरीत्या करता येईल. खड्ड्यांमुळे या महामार्गावर नागरिकांना पावसाळ्यात मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच पावसाळ्यात येणार्‍या अडचणी आणि समस्यांसाठी संबंधित यंत्रणांनी तयारी ठेवावी या रस्त्यावर खड्डे पडणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे निर्देशही ना. भुजबळ यांनी दिले.

हेही वाचा :

 

Back to top button