नाशिक : कृषी विज्ञान संकुलातील झाडांना क्यूआर कोड | पुढारी

नाशिक : कृषी विज्ञान संकुलातील झाडांना क्यूआर कोड

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा
वृक्ष संवर्धनासाठी बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करून काष्टी (ता. मालेगाव) येथील कृषी विज्ञान संकुलातील शंभराहून अधिक झाडांना क्यूआर कोड लावण्यात आला आहे. या पद्धतीने या परिसरातील विविध झाडे, फळझाडे, फुलझाडांची इत्थंभूत माहिती मिळणार आहे.

कृषी विज्ञान संकुलाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विश्वनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला आहे. हे क्यूआर कोड थेट त्या झाडांच्या संदर्भात गूगलवरती असलेली विकिपीडिया लिंक याच्याशी जोडण्यात आली आहे, त्यामुळे गूगल लेन्सच्या सहाय्याने सदर लिंकवर गेल्यास प्रत्येक झाडाविषयीची संपूर्ण शास्त्रीय माहिती मिळते. झाडांच्या संदर्भात संशोधन करण्यास जैविक व वनस्पतीशास्त्राचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थी व अभ्यासक यांना अतिशय उपयुक्त ठरणार आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे डॉ. प्रमोद रसाळ, सहयोगी अधिष्ठाता कृषी निम्नस्तर डॉ. श्रीमंत रणपिसे, सहयोगी अधिष्ठाता धुळे डॉ. सी. डी. देवकर, डॉ. श्रीधर देसले व डॉ. रवीजी आंधळे यांच्या हस्ते प्रत्येक झाडास क्यूआर कोड लावण्यात आले. सहायक प्राध्यापक डॉ. पंकज सूर्यवंशी यांनी हा उपक्रम हाती घेऊन पूर्णत्वास नेला. यासाठी कृषि संकुलातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ. संजय पाटील व डॉ. दिनेश बिरारी यांच्यासह सहकारी यांचे मार्गदर्शन लाभले.

विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रयोगशील बनण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पर्यावरण व वृक्ष या संदर्भात क्यूआर कोड सहयोगी प्रा. डॉ. पंकज सूर्यवंशी व सहकारी यांनी ही संकल्पना विकसित केली आहे. – डॉ. विश्वनाथ शिंदे, सहयोगी अधिष्ठाता.

महाविद्यालयास अभ्यासगटाने भेट दिल्यास त्यांना क्यूआर कोड स्कॅन करूनच त्यांना झाडाची, फुलांची संपूर्ण माहिती मिळते, कारण हा कोड थेट गूगलशी लिंक आहे. प्रत्येक ठिकाणी अशा गोष्टी केल्या पाहिजेत. – राकेश कुमार, विद्यार्थी, कृषी महाविद्यालय, काष्टी.

हेही वाचा:

Back to top button