नाशिक : भंडारदर्‍यात काजवा महोत्सवाची धूम | पुढारी

नाशिक : भंडारदर्‍यात काजवा महोत्सवाची धूम

नाशिक (पिंपळगाव मोर) : नीलेश काळे
नाशिक-नगर जिल्ह्यांच्या सरहद्दीवरील भंडारदरा कळसूबाई या पर्यटन स्थळी दरवर्षी मे-जूनमध्ये काजवा महोत्सवाचे आयोजन होत असते. ग्रीष्म ऋतू संपतो न संपतो तोच वर्षा राणीच्या स्वागतासाठी निसर्गदेवता जणू काजव्यांच्या रूपात धरतीवर अवतरलीय की काय, असा विचार मनात चमकून जावा, गगनातील तारांगण जणू भुईवर उतरलेय, इथे रात्र चांदण्यांची झालीय त्याचा प्रत्यय येथील महोत्सवाच्या निमित्ताने काजव्यांच्या दुनियेत येतो.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे महोत्सवावर बंदी घातल्याने याचा आनंद पर्यटकांना घेता आला नव्हता पण यावर्षी कोरोनाचे सावट दूर झाल्याने परिसरातील काजव्यांचे लुकलुकणे पर्यटकांना अनुभवता येत आहे. काजव्यांची लुकलुक मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्यामुळे भंडारदर्‍याला खर्‍या अर्थाने काजव्यांची चाहूल लागल्याचे दिसते. परिसरात काजव्यांची लुकलुक पाहण्यासाठी मुंबई, ठाणे, नाशिक, नगर, पुणे आदी मोठ-मोठ्या शहरांमधून येथे पर्यटक हजेरी लावत आहेत. वनविभागाकडून पर्यटकांना काजव्यांच्या जादूच्या दुनियेचा आनंद घेता यावा म्हणून जय्यत तयारी करण्यात आली आहे. नियमांचे पालन करून काजवा महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन नाशिक विभागाचे सहायक वनसंरक्षक अधिकारी गणेश रणदिवे यांनी केले आहे. दरवर्षी काजवा महोत्सवाच्या निमित्ताने त्या भागात साधारण 40 ते 50 लाखांची उलाढाल होते. तेथील स्थानिक गाइड्सला रोजगार प्राप्त होतो. तसेच परिसरातील 10 ते 15 हॉटेल, रेस्टॉरंट, घरगुती खानावळी यांचा साधारण 40 लाखांच्या आसपासचा हॉटेल व्यवसायात आर्थिक उलाढाल होतेे. काजवा महोत्सवामुळे स्थानिक अर्थकारणाला बूस्टर डोस मिळतो.

अनोखी दुनिया
भंडारदरा-घाटघर कळसूबाई परिसरात पावसाळ्यातील जलोत्सव, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये फुलोत्सव आणि मेअखेर आणि जूनच्या पहिल्या पंधरवड्यात हजारो झाडांवर काजव्यांची ही अनोखी दुनिया अवतरते. कळसूबाईच्या पायथ्याशी घाटघर, उडदावणे, पांजरे, मुरशेत, मुदखेल, कोलटेंभे, भंडारदरा, चिंचोंडी, बारी या खेड्यांच्या शिवारात आणि रंधा धबधब्याजवळील झाडे लक्षावधी काजव्यांनी लगडतात. हिरडा, बेहडा, सादडा, जांभूळ, आंबा, उंबर अशा निवडक झाडांवरच काजव्यांचा हा काही दिवसांचा अद्भूत खेळ चालतो.

पर्यटकांमुळे वनक्षेत्रात होणारे नुकसान टाळण्यासाठी वनविभाग, महोत्सव आयोजक आणि गावकरी या वर्षी एकत्र काम करत आहेत. यंदा पर्यटकांना जंगलात वाहन नेता येणार नाही. पर्यटकांना सुरुवातीलाच वनविभागाच्या नियमांची पूर्वसूचना देण्यात येत आहे. सुटीच्या दिवशी होणारी गर्दी टाळण्यासाठी शक्य असल्यास आठवड्याच्या इतर दिवशी काजवा महोत्सव पाहण्यास यावे. – रवी ठोंबाडे, संयोजक, काजवा महोत्सव, भंडारदरा.

हेही वाचा:

Back to top button