Uday Samant | नाशिकच्या मैदानात मंत्री उदय सामंतांची एंट्री? | पुढारी

Uday Samant | नाशिकच्या मैदानात मंत्री उदय सामंतांची एंट्री?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शिवसेना शिंदे गटाने नाशिकची जागा प्रतिष्ठेची केली असून, त्यासाठी मोठी फौज मैदानात उतरवली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: नाशिकच्या जागेवर विशेष लक्ष ठेवून असून, गेल्या आठ दिवसांत त्यांनी तब्बल तीनदा नाशिकचा दौरा केला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे, उद्योगमंत्री उदय सामंत यांनाही त्यांनी नाशिकच्या मैदानात उतरविले आहे. नियोजनाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावर टाकल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, सेनेचा नवा संकटमोचक सामंत यांच्या नावाची कार्यकर्त्यांमध्ये एकच चर्चा रंगत आहे.

तब्बल दोन वेळा नाशिकचे मैदान मारलेल्या खासदार गोडसे तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र, शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्याकडून त्यांना जोरदार टक्कर दिली जात असल्याने, मुख्यमंत्र्यांनी ही जागा प्रतिष्ठेची केली आहे. दि. १३ मे रोजी चौथ्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी नाशिककडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. रविवारी (दि. १२) ते उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत नाशिकमध्ये होते. यावेळी दोघांनी संयुक्तपणे शहरातील उद्योजक, व्यापाऱ्यांची बैठक घेत, त्यांचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी (दि.१३) उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पुन्हा उद्योजकांची बैठक घेतली.

शिवसेना शिंदे गटाबरोबरच महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील जवळपास सर्वच प्रमुख पदाधिकारी नाशिकच्या मैदानात उतरले आहेत. शिंदे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रचारात उडी घेतली आहे. भाजपचे तिन्ही आमदार तसेच मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील, गिरीश महाजन हेदेखील नाशिकच्या जागेवर लक्ष ठेवून आहेत. महायुतीने या जागेसाठी मोठी फौज उतरविली असली तरी, त्याचा कितपत फायदा होईल, हे निकालाअंतीच स्पष्ट होईल.

भाजप प्रचारात; राष्ट्रवादी गायब

महायुतीमधील तीन पक्षांपैकी शिंदे सेनेबरोबर भाजप सक्रीय असून, राष्ट्रवादी अजित पवार गट क्वचितच नजरेस पडत असल्याचे दिसून येत आहे. भाजपचे मंत्री गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे-पाटील सातत्याने प्रचारात सहभागी होत आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्ह्यातील हेवीवेट नेते छगन भुजबळ क्वचितच प्रचारात दिसून येत आहेत. वास्तविक, सेना-भाजपकडूनच भुजबळांना प्रचारातून दूर ठेवले गेल्याची सुरुवातीला चर्चा रंगली होती. त्यामुळे भुजबळ क्वचितच प्रचारात दिसून आले. तर अन्य स्थानिक पदाधिकारीदेखील अधुनमधून प्रचारात दिसून आले.

हेही वाचा –

Back to top button