महादेव अ‍ॅपवर सट्टा खेळविणार्‍या पाच जणांना पोलिस कोठडी; मुख्य आरोपी मात्र फरारच

महादेव अ‍ॅपवर सट्टा खेळविणार्‍या पाच जणांना पोलिस कोठडी; मुख्य आरोपी मात्र फरारच

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : नारायणगाव येथील एका इमारतीत महादेव बुक व लोटस 365 या अ‍ॅपद्वारे ऑनलाइन सट्टा खेळविणार्‍या 93 जणांपैकी पाच जणांना गुरुवारी (दि. 16) जुन्नर न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून, उर्वरित 88 जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. यातील मुख्य आरोपी प्रसिद्ध व्यापारी ऋतिक सुरेश कोठारी (रा. नारायणगाव, ता. जुन्नर) व दुसरा आरोपी राजू भोकरिया (रा. जुन्नर ) हे दोघे आणि सलमान शेख (रा. जुन्नर) फरारी झाले असून, त्यांना शोधण्यासाठी दोन पथके पुणे, मुंबई येथे रवाना केली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या अनधिकृत कॉल सेंटरवर बुधवारी पोलिसांनी छापा टाकून नारायणगावामध्ये मोठी कारवाई करून 93 जणांना ताब्यात घेतले होते. कोठारी, भोकरिया आणि शेख या मुख्य आरोपींचा शोध लागेपर्यंत याच्या मुळापर्यंत पोलिस पोहोचू शकणार नाहीत. या आरोपींना फरार होण्याची संधी कशी मिळाली, त्यांना छाप्याची माहिती आधीच मिळाली होती का, याची चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान, 93 आरोपींपैकी 3 जण अल्पवयीन असल्याने त्यांना सुधारगृहात दाखल करण्यात येणार आहे. एकूण आरोपींपैकी 5 जणांनाच जुन्नर न्यायालयात हजर केले होते, तर उर्वरित आरोपींची घटना घडलेल्या ठिकाणी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी घेण्यात आली.

न्यायालयीन कोठडी मिळालेल्यांचा जामीन अर्ज जुन्नर न्यायालयाने फेटाळल्याने त्यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगाव शहराच्या मध्यभागी हा ऑनलाइन पद्धतीने सट्टा खेळला जात होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने माहिती मिळल्यावर पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई केली होती. याची माहिती स्थानिक पोलिस स्टेशनला व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागला का समजू शकली नाही? असा सवाल विचारला जात आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news