भाजपला सत्तेसाठी झगडावे लागणार | पुढारी

भाजपला सत्तेसाठी झगडावे लागणार

ज्ञानेश्वर बिजले

पुणे :

भारतीय जनता पक्षाला सलग दुसर्‍यांदा महापालिकेत एकहाती सत्ता मिळविण्यासाठी झगडावे लागणार आहे. भाजपची निवडणुकीची रणनीती तयार झाली असून, इच्छुकांची संख्या जास्त असल्याने सक्षम उमेदवार निवडताना पक्षश्रेष्ठींची कसोटी लागणार आहे.
आक्रमक विरोधकांना तयारीला पुरेसा वेळ मिळाला आहे. तरीदेखील महापालिका निवडणुकीच्या तयारीमध्ये भाजप विरोधकांच्या तुलनेत खूपच पुढे गेला आहे.

प्रत्येक प्रभागात कोणता उमेदवार उभा करता येईल, त्याची आखणी झाली आहे. भाजपचे नेते देेवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेनंतर काही जणांना प्रभागात निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत. त्यामुळे ते आत्तापासूनच प्रचाराला लागू शकतील.
पुण्यात भाजपची राजकीय ताकद 2014 पासून वाढत गेली. लोकसभेपाठोपाठ भाजपने 2014 मध्ये विधानसभेच्या पुणे शहरातील आठही जागा जिंकल्या. चार सदस्यांचा एक प्रभाग झाल्याने निवडणूक व्यक्तीपेक्षा पक्षावर गेली.

फ्रान्समध्ये सूर्य निर्मितीचा प्रयत्न

मोदी लाट, राज्यातील सत्ता, कार्यकत्र्यांचे बुथरचनेचे जाळे आणि पराभूत मानसिकतेत गेलेले विरोधक, याचा फायदा घेत भाजपने महापालिकेत 26 जागांवरून थेट 98 वर मजल मारली. पाच वर्षे एकहाती सत्ता राबविली. त्यांच्यासोबत रिपब्लिकन पक्षही आहे. लोकसभा निवडणुकीत 2019 मध्ये भाजपला सव्वातीन लाखांचे मताधिक्य मिळाले. मात्र, त्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत आठही मतदारसंघांत मिळून भाजपची आघाडी 91 हजार मतांपर्यंत घसरली.

राष्ट्रवादीचे दोन आमदार निवडून आले. भाजपने तीन जागा कमी मताधिक्यांनी जिंकल्या. भाजपचे मताधिक्य घटल्यानंतर राज्यातील त्यांची सत्ताही गेली. महाविकास आघाडीमुळे त्या तिन्ही पक्षांतील कार्यकत्र्यांचे मनोबल वाढले आहे. या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. भाजपची पक्षबांधणी भक्कम आहे. बुथस्तरापर्यंत कार्यकत्र्यांची नावे, त्यांचे कामाचे स्वरूप ठरले आहे. वेगवेगळ्या सर्वेक्षणाच्या माध्यमातून प्रभागातील स्थिती, स्वतःबरोबरच विरोधकांच्या ताकदीचा अंदाज बांधण्यात येत आहे.

‘उजनी’ अखेर मायनसमध्ये

नगरसेवकांच्या कामाचे मूल्यमापन केले. बहुतेक प्रभागांत स्वतःची ताकद असलेल्या भाजपकडे सक्षम उमेदवार आहेत. या आधारे भाजप पुन्हा एकहाती सत्ता मिळविण्यासाठी कंबर कसून तयारीला लागला आहे. नवी तीन सदस्यांची प्रभागरचना व आरक्षण झाल्यानंतर भाजपचे अनेक दिग्गज सेफ जागा मिळविण्यासाठी धडपडू लागले आहेत. पाच-सहा प्रभाग भाजपच्या दृष्टीने सेफ झाले आहेत.

तेथील तिन्ही नगरसेवक भाजपचे निवडून येतील. कोथरूड, कसबा पेठ, शिवाजीनगर, पर्वती मतदारसंघातील सेफ प्रभागांवर अनेक नगरसेवक डोळे लावून बसल्याने त्यापैकी काही जणांची संधी यंदा हुकण्याची शक्यता आहे. पक्षांतर्गत गटबाजी, कुरबूर सुरू झाली असली; तरी ती अद्याप फारशी चव्हाट्यावर आलेली नाही.

सांगली : सहा दिवसांपूर्वीच लग्न झालेल्या प्रेयसीसह प्रियकराची आत्महत्या

मुख्यत्वे आमदार त्यांच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी धडपडण्याची शक्यता आहे. गेल्या वेळी बाहेरून पक्षात आलेल्या अनेकांना संधी मिळाली. या वेळी पक्षाचे जुने कार्यकर्तेही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी आग्रही आहेत. भाजपला सत्तर ते ऐंशी जागा मिळतील, असा प्राथमिक अंदाज जाणकारांकडून व्यक्त केला जातो. त्यावर आणखी दहा-पंधरा जागा मिळविण्यासाठी त्यांना कष्ट घ्यावे लागतील. नव्वदचा टप्पा ओलांडल्यावरच त्यांना सत्ता मिळू शकेल. त्या दृष्टिकोनातून रणनीती आखण्यात येऊ लागली आहे.

Back to top button