शिवसेनेकडून अक्कलकुव्यातील आमशा पाडवी यांना विधान परिषदेची उमेदवारी | पुढारी

शिवसेनेकडून अक्कलकुव्यातील आमशा पाडवी यांना विधान परिषदेची उमेदवारी

नंदुरबार ( पुढारी वृत्तसेवा)

सध्या राज्याच्या विधान परिषद निवडणुकीविषयी उत्सुकता निर्माण झाली असतानाच शिवसेनेने नंदुरबार जिल्ह्याच्या अक्कलकुवा तालुक्यातील आमशा पाडवी यांना उमेदवारी देऊन नंदुरबार जिल्ह्यातील शिवसैनिकांना सुखद धक्का दिला आहे.

आमशा पाडवी हे नंदुरबार जिल्हा शिवसेनाप्रमुख पदावर आहेत. मागील तीस वर्षापासून अक्कलकुवा भागात ते कार्यरत असून अतिदुर्गम भागात त्यांंनी स्वतःचे चांगले संघटन केले आहे. विशेष असे की, काँग्रेस पक्षाचे विद्यमान आदिवासी विकास विभागाचे कॅबिनेट मंत्री अॅड. के. सी. पाडवी हे या मतदारसंघातून सलग सहा वेळेस निवडून आले आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणूक प्रसंगी याच अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेतर्फे धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढविली होती. तथापि के. सी. पाडवी यांच्यासमोर आमशा पाडवी यांना अवघ्या 1200 मतांसाठी पराभूत व्हावे लागलेे होते. त्यावेळी महाविकास आघाडी स्थापन झालेली नव्हती. परंतु विद्यमान स्थितीत शिवसेना आणि काँग्रेस हे आघाडीचे घटक पक्ष असूनही अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात आपापले वर्चस्व वाढविण्याची स्पर्धा त्यांंनी चालू ठेवली आहे. शिवसेनेने या विधानसभा मतदार संघात सातत्याने आपल्या पक्षाची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न चालवले असून आमशा पाडवी यांना शक्ती पुरविणे चालू ठेवलेे आहे. आता आमशा पाडवी यांना विधानसभा विधान परिषद निवडणुकीची जाहीर झालेली उमेदवारी त्याअर्थाने पाहिले जाऊ शकते.

दरम्यान उमेदवारीविषयी वृत्तवाहिनीशी बोलताना आमशा पाडवी यांनी स्वतः सांगितले की शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सोमवारी रात्री फोन करून विधानपरिषद उमेदवारी देण्यात येत असल्याची माहिती मला दिली. पक्षाचा आदेश असेल त्याप्रमाणे पुढील काम केले जाईल असेही पाडवी म्हणाले.

हेही वाचा :

Back to top button