नाशिक : एक धोकादायक वृक्ष काढल्यास 100 वृक्ष लावणार; राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा निश्चय | पुढारी

नाशिक : एक धोकादायक वृक्ष काढल्यास 100 वृक्ष लावणार; राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा निश्चय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील वर्दळीच्या रस्त्यावरील धोकादायक वृक्षांमुळे जीवितहानी होत असून, धोकादायक वृक्ष हटविल्यास युवक राष्ट्रवादी एक वृक्षाच्या बदल्यात 100 वृक्ष लावेल, असे पत्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी नाशिक महापालिका आयुक्त रमेश पवार यांना पाठविले आहे.

शहरातील विविध वर्दळीच्या ठिकाणी मुख्य रस्त्यावर धोकादायक वृक्ष असून, वाहनधारकांचा अंदाज चुकल्याने अपघात होऊन जीवितहानी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. शहरातील गंगापूर रोड, दिंडोरी रोड, तपोवन रोड, औरंगाबाद रोड व उपनगर यांसारख्या विविध प्रमुख मार्गांवर असे 20 ते 25 धोकादायक झाडांचा प्रश्न गंभीर बनला आहे. या मार्गांवर रोजच वाहतुकीची मोठी वर्दळ असते. अनेकदा वाहनचालकांना अंदाज न आल्यास ते वृक्षावर आदळतात. तसेच जोरदार वारा किंवा पावसात या धोकादायक झाडांच्या फांद्या केव्हाही कोसळत असल्याने वाहनधारक व नागरिक जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अशी धोकादायक वृक्ष काढून टाकावी. वृक्ष काढल्यास एका वृक्षाच्या मोबदल्यात 100 वृक्ष लावण्याचे राष्ट्रवादीने म्हटले आहे.

नाशिक शहरात उड्डाणपुलाच्या नावाखाली 100 वर्षांहून अधिक जुने झाड गरज नसताना तोडण्याची पावले उचलली जातात; परंतु जी झाडे खरच धोकादायक आहेत अशी झाडे तोडण्यास पर्यावरणप्रेमींचा विरोध नाही. शहरातील विविध ठिकाणांवरील 20 ते 25 धोकादायक झाडे तातडीने हटविल्यास राष्ट्रवादी एका धोकादायक वृक्षाच्या बदल्यात मोकळ्या भूखंडावर 100 वृक्षारोपण करतील. – अंबादास खैरे, शहराध्यक्ष, युवक राष्ट्रवादी काँग्रेस

हेही वाचा:

Back to top button