सोलापूर : भीमा सहकारी साखर कारखाना निवडणूक, अंतिम मतदार यादी जाहीर | पुढारी

सोलापूर : भीमा सहकारी साखर कारखाना निवडणूक, अंतिम मतदार यादी जाहीर

टाकळी सिकंदर; पुढारी वृत्‍तसेवा : टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूक संदर्भातील सभासद अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ६ गटांमध्ये १९ हजार ३८७ एवढे मतदार निवडणुकीस मतदानासाठी पात्र झाल्याची माहिती साखर सहसंचालक पांडुरंग साठे यांनी दिली. यामुळे आता लवकरात लवकर भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधूमाळी चालू होणार आहे. खर तर या मतदार यादीकडे सर्व सभासदांचे लक्ष लागून राहिले होते.

सोलापूर जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा सोलापूर विभागाचे प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी या कारखान्याची ही अंतिम मतदार यादी जाहीर केली आहे. या संस्थेच्या सभासदांना या यादीवर दावे आणि आक्षेप दाखल करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. या मतदार यादीवरील दावे आणि आक्षेप अर्जाच्या माध्यमातून १८५२ हरकती आल्या होत्या. या हरकतींवर सुनावणी होऊन शेअर्सची रक्कम पूर्ण केलेल्या ७९६ सभासदांची नावे अंतिम मतदार यादीत आखेर समाविष्ट करण्यात आली आहेत.

भीमा बचाव समितीने यादीमधील काही सभासद कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील नाहीत असा आक्षेप घेतलेल्या एकूण २१२५ सभासदांचे सभासदत्व मात्र प्रादेशिक सहसंचालकांनी रद्द केले होते. यावर सहकारमंत्र्यांनी या निकालाला स्थगिती दिली होती. तर १९४ सभासदांच्या नावे स्टे ऑर्डर दिली होती. ही नावे यादीत समाविष्ट करण्याबाबत आदेश दिला होता, परंतु या पैकी ८० सभासदांनी शेअर्सची रक्कम पूर्ण केल्यामुळे त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट झाली आहेत.

हे ही वाचलंत का? 

Back to top button