नाशिक : एटीएम कार्डची अदलाबदल करून गंडविणारा गजाआड | पुढारी

नाशिक : एटीएम कार्डची अदलाबदल करून गंडविणारा गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मदतीच्या बहाण्याने एटीएम कार्डची अदलाबदली करून महिलेस आर्थिक गंडा घालणार्‍या संशयितास भद्रकाली पोलिसांनी गजाआड केले आहे. वरिंदर बिलबहादूर कौशल (42, रा. जेलरोड) असे या संशयिताचे नाव आहे.

नागजी चौक येथील रहिवासी अर्चना श्रीराम रोकडे यांच्या फिर्यादीनुसार, त्या शुक्रवारी (दि.3) दुपारी 2.30 च्या सुमारास द्वारका येथील एटीएम केंद्रात पिनकोड जनरेट करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी संशयिताने त्यांना मदत करण्याच्या बहाण्याने एटीएम कार्ड घेतले. त्यानंतर संशयिताने अर्चना यांना दुसरे एटीएम कार्ड देत त्यांचे एटीएम कार्ड स्वत:कडे ठेवले. त्यानंतर त्या एटीएमचा वापर करून संशयिताने अर्चना यांच्या बँक खात्यातून 23 हजार 100 रुपये काढून फसवणूक केली. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली संशयिताचा शोध सुरू होता. भद्रकालीचे पोलिस अंमलदार विशाल काठे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने संशयित कौशल यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने अर्चना यांची फसवणूक केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून 23 हजार 100 रुपयांची रोकड जप्त केली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, अंमलदार काठे, कय्युम सैयद, संदीप शेळके आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा:

Back to top button