नाशिक : जकात नाका वसूलीत अपहार; कृउबा कर्मचारी थेट निलंबित | पुढारी

नाशिक : जकात नाका वसूलीत अपहार; कृउबा कर्मचारी थेट निलंबित

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

जकात नाका वसुली अपहार प्रकरणी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एका कर्मचाऱ्यास प्रशासक फैयाज मुलाणी यांनी निलंबित केले आहे. एस. व्ही. जाधव असे या कर्मचाऱ्याचे नाव असून, या निलंबनाचे लेखी आदेशही त्यांनी पारित केले आहेत.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील जकात नाका येथे नियंत्रित शेतमालाची आवक नोंद करणे, अन्नधान्य व्यापाऱ्यांच्या नियंत्रित शेतमालावरील मार्केट फी व सुपर व्हिजन फी वसुली करणेकामी एस. व्ही. जाधव यांची नियुक्ती केलेली होती. सदर कर्मचाऱ्याच्या वसुलीबाबत आढाव बैठक झाली होती. तसेच याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने विभागनिहाय चौकशी सुरू असताना प्राप्त अहवालात असे निदर्शनास आले की, वसूलीकामी या कर्मचाऱ्याने एकाचवेळी दोन-दोन पावती पुस्तके नेल्याचे आढळले. वास्तविक एक पावती पुस्तक पूर्ण संपेपर्यंत तेच वापरले पाहिजे व ते बाजार समितीच्या कार्यालयात जमा करीत दुसरे पावती पुस्तक घेतले पाहिजे. मात्र या प्रकरणी अहवालात १/१२/२०२१ ते २४/०५/२०२२ या कालावधीत एकूण १३ पावती पुस्तके या कर्मचाऱ्याने घेतले आणि फक्त चार पावती पुस्तकांचाच भरणा केला. उर्वरित नऊ पावती पुस्तकांचा भरणा केलेला नाही. तसेच संबधित अन्नधान्य व्यापाऱ्यांना अनधिकृत पावती देऊन स्वतःच्या फायद्याकरिता वापर केल्याचेही निदर्शनास आले.

यामुळे बाजार समितीचे आर्थिक नुकसान झाल्याचे अहवालात आढळले. याबाबत वेळोवेळी सूचना करूनदेखील संबंधित कर्मचाऱ्याने याकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष केले. त्यामुळे सेवा नियम क्रमांक २७ नुसार सेवेतील कर्मचारी नियम १०२ अन्वये नमूद तरतुदीनुसार कर्मचारी शिक्षेस प्राप्त असतो. त्याप्रमाणे खातेनिहाय चौकशी होईपर्यंत ३० मे २०२२ पासून बाजार समितीच्या सेवेतून एस. व्ही. जाधव या कर्मचाऱ्यास निलंबित करण्याचे आदेश प्रशासक फैयाज मुलाणी यांनी काढले.

हेही वाचा :

Back to top button