जि. प. गट, गणाचा लाभ कोणाला होणार? | पुढारी

जि. प. गट, गणाचा लाभ कोणाला होणार?

सातारा : पुढारी वृत्तसेवा

जिल्हा परिषदेच्या गट व गणांची सन 2011 च्या लोकसंख्येनुसार नव्याने रचना करण्यात आली आहे. या रचनेकडे सर्वांच्या नजरा लागल्या असून नव्या गट व गणाचा लाभ कोणाला होणार? अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

सातारा जिल्हा परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाल मार्च 2022 मध्ये संपला त्यानंतर प्रशासक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी सूत्रे हाती घेतली. राज्य शासनाने कायदा करून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण मिळण्यासाठी निवडणूक पुढे ढकलली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.

जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण प्रारुप प्रभाग रचनेचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने दि. 10 मे रोजी जाहीर केला. नवीन लोकसंख्येच्या निकषानुसार सातारा जिल्हा परिषदेमधील गटांची संख्या 64 वरुन 73 वर तर पंचायत समिती गणांची संख्या 128 वरुन 146 वर पोहोचली आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार दि.2 जून रोजी जिल्ह्यातील नवीन गट व गणांची नावे समोर येणार आहेत. कोणती गावे कोणत्या गटात व गणात गेली आहेत. तसेच नव्याने कोणते गट व गण अस्तित्वात येणार आहेत याची माहिती समजणार असल्याने इंच्छुकांचे लक्ष लागून राहिले आहे.

तसेच नव्या जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाचा लाभ कोणाला होणार याकडे राजकीय पदाधिकार्‍यांचे डोळे लागले आहेत. लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बार उडणार असल्याने त्यादृष्टीने राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. गट व गणाची अंतिम रचना आयोगाकडून जाहीर झाल्यानंतर खर्‍या अर्थाने निवडणुकीला रंगत येणार आहे. इच्छुकांनीही सार्वजनिक कार्यक्रमातून मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

तसेच गट व गणांमध्ये विविध पक्षाकडून खात्रीशीर व प्रभावी उमेदवारांचा कानोसा काही राजकीय पदाधिकारी घेताना दिसत आहेत. सध्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. मात्र अगामी होणार्‍या निवडणुकीत सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना, भाजपा व अन्य पक्षांनी स्वबळाचा नारा दिला आहे. मात्र महाविकास आघाडीचे एकत्रीत निवडणुका लढवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. असे असले तरी स्थानिक पातळीवरील पक्षीय प्राबल्याचा विचार करुन या निवडणुका लढवल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच पक्षातील इच्छुकांसह नेतेमंडळीकडून मोर्चेबांधणीला वेग आला आहे.

विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साधला जातोय संपर्क

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येवू लागल्या आहेत. तसतसे लग्नसमारंभ, सुपारी, वाढदिवस, विविध कामांचे उद्घाटन व शुभारंभ यासह विविध कार्यक्रमांसाठी इच्छुकांची वर्दळ वाढली आहे. तसेच गावोगावच्या लग्नसोहळ्यामध्येही विविध पक्षांच्यासह राजकीय पदाधिकार्‍यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन होताना दिसत आहे. अशा प्रकारच्या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिकांशी संपर्क साधला जात आहे.

Back to top button