सातारा : पुढारी वृत्तसेवा
मंगळवारी मध्यरात्री जिल्ह्याच्या काही भागाला पावसाने चांगलेच झोडपून काढले. अचानक झालेल्या पावसाने द्राक्ष बागांसह फळझाडांचे नुकसान झाले आहे. मान्सून सक्रिय होत असल्याने खरीप हंगामातील पेरणीपूर्व मशागतीसह ऊसाची भरणी, फोडणी तसेच आले, हळद लागवड आदि शेतीच्या कामांना वेग आला आहे.
गेल्या आठवड्यापासून वातावरणात बदल जाणवत आहे. कडक उन पडू लागल्याने जिल्ह्यात तापमानाचा पारा चढू लागला होता. तर कधी मध्येच आभाळ भरुन येत होते. अशा विचित्र हवामानाचा सामना जिल्हावासिय करत आहेत. अशातच मंगळवारी दिवसभर कडक उन पडले असताना मध्यरात्री अचानक पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण, वाई या भागात या पावसाचा जोर जास्त होता. पावसामुळे द्राक्षबागांसह फळझाडांचे नुकसान झाले आहे. सध्या हंगामी आंबा परिपक्व झाला आहे. आंबे अलगद उतरवून पिकावावे लागतात. मात्र मंगळवारी रात्री झालेल्या पावसात तोडणीस आलेले आंबे झडून पडल्याने त्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
सध्या उन्हाळी हंगामातील भुईमूग, चवळी, घेवडा काढणीची लगबग सुरु आहे. अचानक झालेल्या पावसामुळे काढणी थांबवावी लागली. तसेच उन्हाळी वाळवणे, चटणी, शेवया, लोणचं करण्यात गृहिणी व्यस्त राहत आहेत. मात्र या पावसामुळे बुधवारीही जिल्ह्यात काही ठिकाणी दिवसभर ढगाळ हवामान राहिले. त्यामुळे गृहिणींच्या कामात खंड पाडला. मंगळवारी रात्री पडलेल्या पावसाने बळीराजा सुखावला आहे. वाढत्या उष्म्यामुळे आले, हळद लागवड लांबणीवर पडली होती. मान्सूनच्या शक्यतेने लागवडीची कामे युध्द पातळीवर सुरु आहेत. तसेच सध्या ग्रामीण भागात खरीप हंगामातील पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरु आहेत. लवकरच मान्सून सुरु होणार आहे. त्यापूर्वी पडलेल्या या पावसामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे.
माण तालुक्यातील वरकुटे मलवडी परिसराला मंगळवार रात्री झालेल्या अवकाळी पावसाचा तडाखा बसला. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सुरू झालेला पाऊस काहीशा विश्रांतीनंतर पहाटेपर्यंत सुरु होता. त्यामुळे पिकांना याचा मोठा फटका बसला असून अवकाळी पावसाने शेतकर्यांची दाणादाण उडला. सोसाट्याच्या वार्यामुळे घरावरील पत्रे उडाले तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. तसेच फळ बागांचेही नुकसान झाले आहे.
माण तालुक्यात मंगळवारी रात्री वादळी वार्यासह मुसळधार पाऊस झाला. या पूर्व मोसमी पावसाने शेतीसह घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. माण तालुक्यातील वरकुटे मलवडी, बनगरवाडी, महाबळेश्वरवाडी, शेनवडी, देवापूर, पळसावडे, जांभूळणी या परिसरात जोरदार पाऊस झाला. सोसाट्याच्या वार्यामुळे वरकुटे-मलवडी गावातील अनेक घरांवरील पत्रे उडून गेले. वादळी पावसामुळे सर्वच पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच द्राक्ष, आंबा, पेरु यासह अन्य फळ बागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेकर्यांतून होत आहे.