हनुमान जन्मस्थान वाद, अंजनेरी की किंष्किंधा?; पहा आचार्य गंगाधर पाठक काय म्हणाले… | पुढारी

हनुमान जन्मस्थान वाद, अंजनेरी की किंष्किंधा?; पहा आचार्य गंगाधर पाठक काय म्हणाले...

नाशिक : नाशिकमध्ये हनुमान जन्मस्थळावरुन वाद सुरु आहे.  काल नाशिकमध्ये धर्मसभेत झालेल्या वादानंतर आज गोविंदानंद सरस्वती यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत पुरोहित आचार्य गंगाधर पाठक यांनी प्राथमिक स्तरावर नाशिकमधील अंजनेरी हेही हनुमानाचे जन्मस्थान असल्याचे मान्य केले आहे.

या पत्रकार परिषेदत कालचा वाद मिटवून सर्व महंत एकत्र आले होते. आचार्य गंगाधर पाठक हे न्यायाधीश म्हणून यावेळी उपस्थित होते. यावेळी त्यांनी सर्व तथ्य व पुरावे बघून प्राथमिक स्तरावर नाशिकचे अंजनेरी हे हनुमानाचे जन्मस्थान असल्याचे म्हटले आहे. आतापर्यंत 28 युगे झाली असून प्रत्येक युगामध्ये हनुमानाचा जन्म वेगवेगळ्या ठिकाणी व वेगवेगळ्या तिथींना झाला आहे. यामुळे हनुमान जन्मस्थळाबाबत व जन्म तिथींबाबत केले जाणारे सर्व दावे स्वीकारावे असे आवाहन त्यांनी केले. तसेच गोविंदानंद सरस्वती यांनी त्यांचा हट्ट सोडून देण्याचे आवाहन केले.

यावेळी, काल झालेल्या धर्मसभेत हनुमान जन्मस्थाळावरुन सुरु असलेल्या वादावर निर्णय झाला नाही हे दुर्दैव असल्याचे वक्तव्य अनिकेत शास्त्री यांनी केले. दरम्यान या पत्रकारपरिषदेनंतर गोविंदानंद हे गुजरात येथे जाणार आहेत. कालच्या वादानंतर त्यांची सुरक्षादेखील वाढविण्यात आली आहे.

Back to top button