नाशिक : देशातील पहिले ग्राहक प्रबोधन केंद्र नाशिकमध्ये | पुढारी

नाशिक : देशातील पहिले ग्राहक प्रबोधन केंद्र नाशिकमध्ये

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
भारतातील पहिले कायमस्वरूपी ग्राहक प्रबोधन केंद्र वैधमापनशास्त्र विभाग, महाराष्ट्र शासन, नाशिक महापालिका आणि नाशिक फर्स्ट यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे नाशिक फर्स्टच्या ट्रॅफिक एज्युकेशन पार्कमध्ये सुरू होत आहे. या केंद्राच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन सोमवारी (दि.30) सायं. 4 वाजता पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते होत आहे.

याप्रसंगी मनपा आयुक्त रमेश पवार, वैधमापनशास्त्र यंत्रणेचे नियंत्रक डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांची प्रमुख उपस्थिती असेल. या केंद्रास विद्यार्थी व नागरिकांनी एकदा तरी भेट द्यावी, असे आवाहन नाशिक फर्स्टचे अध्यक्ष अभय कुलकर्णी व वैधमापनशास्त्र विभाग नाशिक जिल्हा सहआयुक्त नरेंद्र सिन्हा व सहायक आयुक्त जयंत राजदेरकर यांनी केले आहे. आज जगामध्ये सर्वांत मोठी व उत्स्फूर्त चळवळ म्हणजे ग्राहक सरंक्षण चळवळ होय. 18 व्या शतकाच्या सुरुवातीला जगामध्ये या चळवळीला सुरुवात झाली. अमेरिका हे पहिले राष्ट्र की जेथे या कार्याला कायद्याचा आधार मिळाला. आज जगामध्ये सर्व ठिकाणी दूरवर ही चळवळ पोहोचली आहे. शासन स्तरावर सध्या राष्ट्रीय ग्राहक दिन व जागतिक ग्राहक दिन असे दोन दिवस साजरे केले जातात. दिवसांचे औचित्य म्हणून प्रदर्शने, चर्चासत्रे व स्पर्धा आयोजित केल्या जातात. परंतु, या सर्व बाबींचे आयोजन तात्पुरत्या स्वरूपात एका सप्ताहासाठीच केले जाते. त्यामुळे त्याचे महत्त्व मर्यादित कालावधीसाठीच टिकते. या विषयाचे महत्त्व व व्याप्ती लक्षात घेता कायमस्वरूपी ग्राहक प्रबोधन केंद्र सुरू करण्याची आवश्यकता होती, याच कारणाने वैधमापनशास्त्र यत्रंणा, नाशिक फर्स्ट व महापालिका नाशिक हे एकत्र येऊन संयुक्तरीत्या हे केंद्र सुरू करीत आहेत.

ग्राहक प्रबोधन केद्रांची वैशिष्ट्ये अशी…
ग्राहकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे.
कायद्याविषयी माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचविणे.
ऑडिओ व व्हिडिओद्वारे मनोरंजनाच्या माध्यमातून माहिती प्रस्तुत करणे.
पहिले प्रबोधन केंद्र उभारण्याचा मान महाराष्ट्र राज्याला मिळाला आहे.

हेही वाचा:

Back to top button