बिल्डरांना धमकावणारा ठग पोलिसांच्या जाळ्यात: खंडणी, गुंडाविरोधी पथकाची संयुक्त कारवाई

बिल्डरांना धमकावणारा ठग पोलिसांच्या जाळ्यात: खंडणी, गुंडाविरोधी पथकाची संयुक्त कारवाई
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

बिल्डरांना धमकावून कोट्यवधी रुपयांची खंडणी मागणार्‍या ठगाला पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. खंडणी आणि गुंडाविरोधी पथकाने शुक्रवारी (दि. 27) डांगे चौक येथे ही कारवाई केली. आदिनाथ बी. कुचनुर (रा. निसर्गराज सोसायटी, डांगे चौक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी केतूल भागचंद सोनिगिरा (41, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी शुक्रवारी (दि. 27) वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची डांगे चौक येथे 'सिग्नेचर पार्क' नावाने बांधकाम साईट सुरू आहे. दरम्यान, आरोपीने त्यांना फोन करून बांधकामात खूप त्रुटी असल्याचे सांगितले. तसेच, त्यांच्या विरोधात नॅशनल ग्रीन ट्रिबुनलकडे खोटे अहवाल सादर करून अडचणीत आणण्याची धमकी दिली. त्यासाठी त्यांच्याकडे सव्वानऊ कोटी इतकी खंडणी मागितली.

दरम्यान, फिर्यादी यांनी पोलिसात तक्रार केली. त्यानुसार, खंडणी व गुंडा विरोधी पथकाने फिर्यादी यांच्या ऑफिसमध्ये साध्या वेशात सापळा रचून आरोपीला खंडणीची रक्कम नेण्यास बोलविले. त्यावेळी ठरलेल्या रकमेपैकी दोन कोटींचा चेक आरोपीला देण्यात आला. चेक हातात घेताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी आरोपीवर झडप घातली. आरोपीला शनिवारी (दि. 28) मोरवाडी न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ही कामगिरी सहायक पोलिस आयुक्त पद्माकर घनवट, प्रशांत अमृतकर, पोलिस निरीक्षक अजय जोगदंड, सहायक पोलिस निरीक्षक हरीश माने, पोलिस कर्मचारी हजरत पठाण, विक्रम जगदाळे, गणेश मेदगे, किरण काटकर, शाम बाबा, विजय तेलेवार, आशिष बोटके, तौसिफ़ शेख यांच्या पथकाने केली.

दोन वर्षांच्या कारावासानंतरही मस्ती कायम

आरोपीवर निवृत्त न्यायाधीशांची कागदपत्रे बनविणे, बांधकाम व्यवसायिकांना ब्लॅकमेल करणे, महापालिकेच्या अधिकार्‍यांवर खोटे आरोप करून त्यांना वेठीस धरणे, वास्तुविशारदांची बदनामी करणे, अशा आरोपांखाली हिंजवडी, पिंपरी, शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. आरोपीने दोन वर्ष कारावासही भोगला आहे. मात्र, तरी देखील त्याची खोड जिरली नसल्याचे पोलिस सांगतात.

तक्रार देण्याचे आवाहन

फिर्यादी यांनी समोर येऊन तक्रार देण्याचे धाडस दाखविल्याने आरोपी जेरबंद करणे शक्य झाले. त्यामुळे अशा प्रकारे जर कोणीही खंडणीची मागणी करीत असल्यास न घाबरता तक्रार द्यावी, असे आवाहन पोलिस आयुक्त कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news