लसीकरणात नाशिक राज्यात अव्वल, कोणता जिल्हा कोणत्या स्थानी ? | पुढारी

लसीकरणात नाशिक राज्यात अव्वल, कोणता जिल्हा कोणत्या स्थानी ?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत उत्तमोत्तम कामगिरी करत नाशिकने राज्यात लसीकरणाचा उच्चांक गाठला आहे. 12 ते 14 वयोगटाचे 84.6 टक्के लसीकरण करीत नाशिकने राज्यात अव्वल स्थान मिळवले आहे. दुसर्‍या स्थानी सांगली जिल्हा असून, तिसर्‍या स्थानावर अहमदनगर जिल्हा आहे. इतर वयोगटाच्या लसीकरणातही नाशिकची कामगिरी समाधानकारक आहे.

लसीकरणात प्रारंभापासून नाशिक जिल्हा उत्तर महाराष्ट्रात आघाडीवर आहे. आता राज्यात अव्वलस्थानी आल्याने, आरोग्य विभागाचे विशेष कौतुक केले जात आहे. नाशिक जिल्ह्यात 12 ते 14 वयोगटातील लसीकरणधारकांची संख्या 7 लाख 43 हजार 943 इतकी आहे. त्यापैकी पहिला डोस 1 लाख 87 हजार 749 जणांनी घेतला आहे. तर दुसरा डोस घेणार्‍यांची संख्या 1 लाख 35 हजार 59 इतकी असून, दोन्ही डोस घेणार्‍यांची संख्या 2 लाख 91 हजार 308 इतकी आहे. त्याचबरोबर इतर वयोगटातही नाशिक जिल्ह्याची कामगिरी समाधानकारक आहे.

15 ते 17 वयोगटातील लसीकरणात नाशिक राज्यात 12 व्या स्थानी आहे. या गटात दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या 4 लाख 17 हजार 131 इतकी आहे. त्याचबरोबर 18 व त्यापेक्षा अधिक वयोगटात नाशिक 15 व्या स्थानी असून, या वयोगटात दोन्ही डोस घेतलेल्यांचे प्रमाण 90.31 टक्के इतके आहे. कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी लसीकरण सर्वांत महत्त्वाची असून, नाशिककरांनी सुरुवातीपासूनच त्यास चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे.

उत्तर महाराष्ट्रात अव्वल
लसीकरणात नाशिक जिल्हा सुरुवातीपासूनच उत्तर महाराष्ट्रात अव्वल असल्याचे दिसून आले आहे. नाशिकमधील आरोग्य कर्मचार्‍यांनी लसीकरणाच्या पहिल्या दिवशी दिलेला प्रतिसाद लक्ष्यांकाच्या 57 टक्के इतका होता. पुढे ही सरासरी कायम ठेवल्याने, नाशिक जिल्ह्यात बर्‍यापैकी लसीकरण झाले आहे. हे प्रमाण पुढेही कायम राहिल्यास, नाशिक आघाडीवर असलेल्या जिल्ह्यांच्या समीप पोहोचेल असा विश्वास आरोग्य कर्मचार्‍यांनी व्यक्त केला.

हेही वाचा :

Back to top button