नाशिक : खते, बियाण्यांसाठी नोंदणी करा : कृषिमंत्री भुसे | पुढारी

नाशिक : खते, बियाण्यांसाठी नोंदणी करा : कृषिमंत्री भुसे

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा
बचतगट व विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांमार्फत एकाचवेळी बांधावर खते, बियाणे व कीटकनाशके उपलब्ध होण्यासाठी शेतकर्‍यांनी गावातील शेतकरी बचतगट व सोसायट्यांमध्ये मागणी नोंदवावी, असे आवाहन राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले आहे.

कृषी विभाग आणि आरसीएफ कंपनीच्या वतीने राज्यात शेतकरी बांधवांना एकत्रपणे बांधावर खते वाटपाचा शुभारंभ शासकीय विश्रामगृहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. सध्या शेतीविषयक परिस्थिती कठीण असली, तरी शेतकरी अतिशय परिश्रमपूर्वक काम करत आहेत. त्यांना खते, बियाणे, कीटकनाशके व निविष्ठांची आवश्यकता असते. त्यांची एकत्रितपणे खरेदी केल्यास एकाच वेळी उपलब्धता करून देणे शक्य आहे. यासाठी शेतकर्‍यांनी बचतगट व विविध कार्यकारी सहकारी संस्थांकडे आपली किती मागणी आहे, याची नोंदणी करावी, त्यानुसार खतांचा पुरवठा करणार्‍या कंपनीकडून पुरेशा प्रमाणावर साठा उपलब्ध करून घेता येईल, असे कृषिमंत्र्यांनी स्पष्ट केले. खते वापरताना मातीचा नमुना तपासून जमीन आरोग्यपत्रिका तयार करावी. आवश्यकतेनुसारच खतांचा वापर करावा. जैविक खतांना प्राधान्य दिल्यास कमी खर्चात अधिक उत्पादन घेता येऊ शकते. याबाबत कृषी विभागाने शेतकर्‍यांना सर्व खतांचे महत्त्व पटवून द्यावे, असेही त्यांनी अधिकार्‍यांना सांगितले. यावेळी तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, कृषी अधिकारी संदीप पवार, विनोद जाधव आदी उपस्थित होते.

हेही वाचा:

Back to top button