

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : हिंगोली ते सेनगाव मार्गावर देऊळगाव पाटीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. आज सकाळी साडेसहा वाजता ही घटना उघडकीस आली असून, मृत तरुणाची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
देऊळगाव पाटीजवळ काही तरुण मॉर्निंग वॉकसाठी जात हाेते. त्यांना रस्त्यावर एका तरुणाचा मृतदेह आढळला. त्यांनी याची माहिती हिंगोली ग्रामीण पोलिसांना दिली. पोलिस निरीक्षक आर. एन. मळघने, जमादार गजानन पोकळे, आकाश पंडितकर, आशिष उंबरकर, अशोक धामणे, मस्के यांनी घटनास्थळी धाव घेतली.
अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त हाेत आहे. पोलिसांनी परिसरात ओळख पटविण्याचे काम सुरू केले आहे. दरम्यान मागील चार दिवसात राष्ट्रीय महामार्गावरील हा सहावा अपघात आहे. या मार्गावर दररोज होणाऱ्या अपघातांवर आळा घालण्यासाठी प्रशासनानेच तातडीने उपाययोजना करण्याची मागणी हाेत आहे.
हेही वाचलंत का?