

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : राजारामपुरी परिसरातील रहिवासी, वाणिज्य वापर इमारतीमधील बंदिस्त पार्किंग व रस्त्यावरील अनधिकृत 2 अपार्टमेंट व एका हॉस्पिटलवर कारवाई करण्यात आली. कारवाईत दुजाभाव होत असल्याचा आरोप करून महेश उत्तुरे, कमलाकर जगदाळे, रघुनाथ टिपुगडे, सुरेश ढोणुक्षे, दुर्गेश लिंग्रस, विशाल देवकुळे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी अधिकार्यांना धारेवर धरले. यावेळी कार्यकर्ते आणि अधिकारी यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. दरम्यान, 90 मिळकतींचे बंदिस्त पार्किंग खुले करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे.
या भागातील अनेक इमारतींचे पार्किंग बंदिस्त आहे; तर काही ठिकाणी रस्त्यावर अतिक्रमण केल्याने वाहतूकीस अडथळा होत आहे. त्यामुळे महापालिका नगररचना विभग, कावळा नाका आणि राजारामपुरी विभागीय कार्यालय, अतिक्रमण, परवाना व इस्टेट विभागाने संयुक्त कारवाई केली. यावेळी राजारामपुरी सहाव्या गल्लीतील ध्रुपद अपार्टमेंट फॉर मंडलिक असोसिएट, तुलसी अपार्टमेंट व जिरगे हॉस्पिटल या ठिकाणची रहिवासी, वाणिज्य वापर इमारतीमधील बंदिस्त पार्किंग काढण्यात आले. तसेच रस्त्यावरील अनधिकृत बांधकामेही काढण्यात आली.
प्रशासक कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांचे मार्गदर्शनाखाली कारवाई केली. यावेळी नगररचना विभागाचे उपशहर रचनाकार रमेश मस्कर, उपशहर अभियंता बाबूराव दबडे, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, कनिष्ठ अभियंता सुरेश पाटील, महादेव फुलारी, चेतन आरमाळ, गुंजन भारंबे, मयुरी पटवेगार, पद्ममल पाटील, अक्षय अटकर यांनी कारवाईत सहभाग घेतला.