महाराष्ट्राच्या दिव्यांग दिलीप चा अमेरिकेत डंका, जिंकले रौप्य | पुढारी

महाराष्ट्राच्या दिव्यांग दिलीप चा अमेरिकेत डंका, जिंकले रौप्य

नाशिक (सुरगाणा) प्रतिनिधी : नाशिक जिल्ह्यामधील सुरगाणा तालुक्यातील तोरनडोंगरी येथील रहिवासी असलेल्या दिलीप गावित या दिव्यांग खेळाडूने (धावपटू) अमेरिकेत पार पडलेल्या युएसडेझर्ट चॅलेंज गेम्स २०२२ या स्पर्धेत १०० आणि ४०० मीटर स्पर्धेत रौप्य पदक मिळविले. दिलीप हा एका हाताने अपंग असूनही त्याने हे यश संपादन केल्याने त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

तालुक्यातील आदर्श समता शिक्षण प्रसारक मंडळ अलंगुण या शिक्षण संस्थेच्या शहिद भगतसिंग माध्यामिक व उच्च माध्यमिक विद्यालय अलंगुण या विद्यालयात दिलीपने एच. एस. सी पर्यंत शिक्षण घेतले. दिलीपने आमच्या शिक्षण संस्थेचा नावलौकिक अमेरिकेत पोहचविण्याचे काम केले आहे. त्यामुळे आमच्या संस्थेला त्याचा सार्थ अभिमान आहे. एवरेस्ट सर करणारी वीर कन्या हेमलता गायकवाड, खेलो इंडिया खो-खो स्पर्धेचा कर्णधार दिलीप गावीत, वनराज देशमुख, नॅशनल ॲथेलेटीक्स दुर्गेश महाले, हिरामण थविल यांनी आधीच या संस्थेचे नाव देश पातळीवर कोरले असून त्यात भर टाकून दिलीपने आज संस्थेच्या गौरवात भर घातली असल्याची भावना संस्था अध्यक्ष जे. पी. गावीत यांनी व्यक्त केली.

दिलीप विषयी थोडसं….

दिलीप हा गरीब आदिवासी कुटुंबातील मुलगा, आई मोहना आणि वडील महादू गावीत हे दांपत्य फॉरेस्ट प्लॉट वर शेती करुन कुटुंब चालवतात. अशा कठीण परिस्थितीत मुलगा शिकावा यासाठी तळमळ असलेल्या आई वडिलांनी दिलीपला एका हाताने तो अपंग असला तरी याला शिक्षण हेच शस्त्र तारू शकते, ही बाब ओळखली आणि शिक्षणासाठी माघे-पुढे न पाहता मोलमजुरी करून त्याला शाळेत शिक्षणासाठी पाठविले. दिलीप जसजसा एकेक वर्ग पुढे गेला तसतसे त्याचे शाळेत मन रमत गेले, स्वतःची शारीरिक क्षमता, स्वतःतील खेळाची आवड ओळखून त्याने खेळाकडे लक्ष वळविले. अलंगुनच्या क्रीडा मैदानावर सराव सुरू केला. येथील माध्यमिक शाळेत आर. डी. चौधरी, मनोहर चव्हाण यांनी त्याचे धावण्याचे कौशल्य ओळखले. त्यानंतर त्याच्या खेळावर सतत लक्ष देऊन सराव करुन घेतला. खेळातील डावपेच सांगून मार्गदर्शन केले आणि बघता बघता त्याने तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्य, राष्ट्रीय पातळीवरील शालेय स्पर्धेत प्रथम-द्वितीय असे क्रमांक मिळवत आपल्या खेळाचा दर्जा उंचावत नेला.

त्यानंतर पुढील शिक्षणासाठी बाहेर पडल्यानंतरही त्याने आपल्या खेळावरील एकाग्रता आणि जिद्द कायम ठेवली. तो सतत कठोर मेहेनत घेत गेला. क्रीडा शिक्षकांचे मार्गदर्शन घेत गेला. म्हणूनच आज एका खेडे गावातली मुलगा आपल्या अपंगात्वर मात करीत अमेरिकेसारख्या देशात रौप्य पदक मिळवू शकला ही अभिमानाची आणि कौतुकाचीच बाब आहे असे संस्था अध्यक्ष जे. पी गावीत यांनी म्हटले आहे. दिलीपच्या या यशामुळे संस्था अध्यक्ष जे. पी गावीत, संचालक ऊर्मिला गावीत, पांडुरंग भोये, परशराम चौधरी, के.डी.भोये, भिका राऊत, हिरामण गावित, प्राचार्य मोरे आदिंनी त्याचे अभिनंदन केले आहे.

हेही वाचा :

Back to top button