अभिजित आंबेकर
शिरूर : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व शिरूर नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी वाढली असून, राज्यात महाविकास आघाडी असली तरी तालुक्यात राष्ट्रवादी व शिवसेनेत फारसे सख्य नसल्याने या दोन पक्षांतच लढत रंगण्याची चिन्हे आहेत.
शिरूर तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत गेल्या वेळी राष्ट्रवादीचा वरचष्मा राहिला आहे. पंचायत समितीवर राष्ट्रवादीची सत्ता आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार बाबूराव पाचर्णे हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे दोन वर्षांपासून सक्रिय राजकारणापासून दूर आहेत.
भाजपकडे पाचर्णे यांच्या तोडीचा नेता नसल्याने त्यांची उणीव भासत आहे. भाजपकडे ठोस चेहरा नसल्याने सध्या तरी पक्षात संभ—मावस्था आहे. सोसायट्यांच्या निवडणुकीत भाजपने प्रमुख नेत्यांच्या गावातील सोसायट्यांमध्ये विजय मिळवल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. राष्ट्रवादीकडे तालुक्यातील प्रमुख सहकारी संस्था ताब्यात असल्याने त्यांच्याकडे इच्छुकांची संख्या जास्त आहे. शिरूर नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांत इच्छुकांची संख्या जास्त आहे. उद्योगपती प्रकाश धारिवाल यांच्या नेतृत्वाखाली सन 2007 पासून शिरूर नगरपरिषदेवर शिरूर शहर विकास आघाडीची सत्ता आहे.
मागील 2016 च्या निवडणुकीत भाजपचे दोन उमेदवार निवडून आल्याने त्यांनी नगरपरिषदेत चंचू प्रवेश केला आहे. 2019 च्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचे आमदार, खासदार निवडून आल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकत्र्यांमध्ये उत्साह संचारला आहे. शिरूर शहर विकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस आदी पक्षांचा समवेश आहे. मात्र 2019 च्या निवडणुकीनंतर राजकीय परिस्थिती बदलली आहे. राष्ट्रवादीकडे इच्छुकांची संख्या जास्त झाल्याने त्यांचे उमेदवार विकास आघाडीकडून लढणार की स्वतंत्र पॅनेल करणार याबाबत शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहे. शिवसेना, काँग्रेस यांना आघाडीत किती स्थान मिळते हे पाहणे महत्त्वाचे आहे. भाजप, लोकशाही क्रांती आघाडी, वंचित बहुजन आघाडी, मनसे आदी पक्षांचीसुद्धा ताकद शिरूर शहरात चांगली आहे.