नाशिक : वस्तुसंग्रहालयात ‘राजा-राणी’ तलवार आकर्षण; 24 मे पर्यंत प्राचीन सरकारवाड्यात प्रदर्शन | पुढारी

नाशिक : वस्तुसंग्रहालयात ‘राजा-राणी’ तलवार आकर्षण; 24 मे पर्यंत प्राचीन सरकारवाड्यात प्रदर्शन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जागतिक संग्रहालय दिन व स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त 18 ते 24 मेदरम्यान सरकारवाडा येथे 10 फूट दांडपट्टा, 12 किलो वजनाच्या राजा-राणी तलवारी, नामवंत लोकांचा दुर्मीळ स्वाक्षरी संग्रह, अडकित्ता इत्यादी वस्तूंचे प्रदर्शन पाहण्याची संधी प्रादेशिक पुरातत्त्व वस्तुसंग्रहालय यांच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे.

यात 300 वर्षांपेक्षा अधिक जुनी व वेगवेगळ्या राज्यांतून जमा केलेली शस्त्रे, तोफ, विविध आकाराच्या सुबक अत्तरदाणी संग्रह, प्राचीन नाणीसंग्रह, चिलीम, दौत, बोरू, कॅमेरे, प्राचीन लाकडाची शुभचिन्हे, घरगुती वापरातील पितळी व विशिष्ट ठेवणीतील वस्तू प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहेत. चेतन राजापूरकर, आनंद ठाकूर, अनंत धामणे, पूजा व नीलेश गायधनी, सोज्वळ साळी, महेंद्र कुलकर्णी, प्रसाद देशपांडे यांचे विविध संग्रह प्रदर्शनात ठेवण्यात आले आहेत. सकाळी 11 ते सायं 6 वाजेपर्यंत उत्सुक व ऐतिहासिक व दुर्मीळ संग्रही प्रदर्शनाचा आनंद घेण्याची संधी नाशिककरांना प्राप्त झाली आहे. तसेच संग्रहाचा छंद असणार्‍यांना सहभागी होण्याची संधी देखील अभिरक्षक विभागाद्वारे देण्यात आली आहे. रविवार 22 मे 4 ते 6 या वेळेत आनंद ठाकूर व त्यांच्या विद्यार्थ्यांचे शस्त्र प्रात्यक्षिक प्रदर्शन होणार आहे. त्याचप्रमाणे प्राचीन लिपी प्रदर्शन, प्राचीन पटखेळ, वृत्तपत्र कात्रणे संग्रह, चित्रकला स्पर्धा आदी कार्यक्रम आहेत.

नाशिकमध्ये अनेक शस्त्र, वस्तू, नाणी व त्यांचे संग्राहक आहेत. त्यांना संग्रह मांडण्याची संधी दिली आहे. युद्धात वापरलेल्या तलवारी, दांडपट्टे, वंशपरंपरेने जपलेल्या वस्तू प्रदर्शनात आहेत. प्रदर्शन 24 मेपर्यंत राहणार आहे. – सोज्वळ साळी, पुरातत्त्व शास्त्रज्ञ आणि संग्राहक.

आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन व स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित दुर्मीळ वस्तू प्रदर्शन मांडण्यात आले आहे. प्रदर्शनात अनेक ऐतिहासिक वस्तू मांडण्यात आल्या आहेत. – आरती आळे, अतिरिक्त सहायक आयुक्त, पुरातत्त्व विभाग नाशिक

हेही वाचा :

Back to top button