नाशिक : … अन् विधवा सुगंधाबाईंनी घातले जोडवे, मंगळसूत्र | पुढारी

नाशिक : ... अन् विधवा सुगंधाबाईंनी घातले जोडवे, मंगळसूत्र

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
हेरवाड (जि. कोल्हापूर) ग्रामपंचायतीने विधवा महिलांसाठी संमत केलेला ठराव शहरातील अंनिस कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे यांनीही आपल्या आईला दाखवला. त्यानंतर त्यांच्या विधवा आई सुगंधाबाईंनी जोडवे, मंगळसूत्र घालत व लाल टिकली लावत परिवर्तनाकडे एक पाऊल टाकले.

हेरवाड येथे महिलेच्या पती निधनानंतर तिच्या बांगड्या फोडणे, तिचे जोडवे व इतर आभूषणे काढून घेणे, टिकली अथवा कुंकू पुसण्याच्या प्रथेवर ठराव करून बंदी आणण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने त्याला अनुसरून परिपत्रक काढत राज्यातील सर्वच ग्रामपंचायतींनी असा ठराव करावा, असे म्हटले आहे. इंदिरानगर येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे यांनी आपल्या विधवा आईला ही बातमी दाखवली. त्यावर आई सुगंधाबाई त्र्यंबक चांदगुडे यांनी सुधारणावाद स्वीकारला व शासन परिपत्रकाचा सन्मान राखत आपल्यात बदल घडून आणण्याचे ठरविले. त्यांनी चांदीचे जोडवे घातले. लाल टिकली लावली. इतकेच नाही, तर मंगळसूत्रही घातले. परिवर्तनाच्या या प्रक्रियेत सहभागी झाल्याबद्दल त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आनंद व्यक्त केला. अशा कुप्रथांमुळे त्रास होत होता. मात्र, आता समाधान वाटत असल्याची भावना सुगंधाबाईंनी व्यक्त केली.

हेही वाचा :

Back to top button