दोन बिबट्यांच्या झुंजीत एकाचा मृत्यू | पुढारी

दोन बिबट्यांच्या झुंजीत एकाचा मृत्यू

बोटा : पुढारी वृत्तसेवा
संगमनेर तालुक्यातील म्हसवंडी गावात दोन बिबट्यांच्या झुंजीत एका नर जातीच्या बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. म्हसवंडी गावच्या परिसरात बाळासाहेब जाधव यांच्या वस्तीजवळ वन विभागाच्या हद्दीत एक बिबट्या मादीबरोबर दोन बिबट्यांची पिल्ले वावरत असल्याचे अनेकदा जाधव वस्तीवरील नागरिकांनी पाहिले.
नुकतेच आशा बाळासाहेब जाधव यांचा पाळीव कुत्रा सायंकाळ पासून दिसला नाही. बहुतेक बिबट्याने शिकार केली असल्याचा संशय म्हणून सकाळी साडेआठच्या दरम्यान बाळासाहेब जाधव आणि आशा जाधव कुत्र्याचा शोध घेत ओढ्याच्या बाजूने फिरत असताना बबन शंकर इथापे यांचे शेतातील आंब्याच्या झाडाजवळ साधारणत: आठ महिन्यांच्या नर जातीच्या बिबट्याचे पिल्लू मृतावस्थेत दिसून आले.
घटनेची माहिती समजताच भाऊसाहेब जाधव, संतोष जाधव, शिवाजी बोडके यांसह गावातील नागरिकांनी जाधव वस्तीकडे धाव घेतली. शिवाजी बोडके यांनी वन विभागास माहिती दिली.  या घटनेची माहिती समजताच वनपरिमंडळ आधिकारी रामदास थेटे, वनरक्षक दिलीप उचाळे, सविता टेमरे, बाळासाहेब वैराळ, तान्हाजी फापाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
मृत बिबट्याचा पंचनामा करत असताना दोन बिबट्यांची झुंज झाली असावी आणि यामध्ये आठ महिन्याचा नर जातीचा बिबट्या ठार झाला असल्याचा अंदाज वन विभागाच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे. मृत बिबट्याचे शवविच्छेदन करून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, अशी माहिती वनरक्षक दिलीप उचाळेंनी दिली.
या बिबट्याच्या पिल्लांचा पंचनामा करत असताना या पिल्लांची आई वन क्षेत्रातून सर्व हालचाली टिपत होती. नागरिकांचे देखील तिच्याकडे लक्ष होते. आपल्या पिल्लासाठी तिचा जीव कासाविस होत होता. तिच्या हालचाली वेगवान होत्या. परंतु नागरिकांची गर्दी असल्याने ती पुढे सरकत नव्हती.
जेव्हा या पिल्लाला वन अधिकार्‍यांनी उचलले, तेव्हा ती हळूहळू जाधव वस्तीकडे असलेल्या आपल्या पिल्लाकडे वाटचाल करू लागली. तसे नागरिकांनी तेथून निघून जाणे पसंद केले. त्यानंतर या मृत बिबट्यास वन अधिकार्‍यांनी कोठे बुद्रुक येथील रोपवाटिकेत नेले.

Back to top button