नाशिक : शहरातील तब्बल ‘इतके’ हॉस्पिटल्स अद्याप फायर ऑडिट विनाच सुरु | पुढारी

नाशिक : शहरातील तब्बल 'इतके' हॉस्पिटल्स अद्याप फायर ऑडिट विनाच सुरु

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आगीसारखी एखादी दुर्घटना घडून त्यात जीवित आणि वित्तहानी होऊ नये यासाठी 15 मीटरच्या पुढे उंची असलेल्या प्रत्येक इमारतीचे फायर ऑडिट करून घेण्याचे राज्य शासनाचे निर्देश आहेत. असे असताना नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून गेल्या पाच महिन्यांपासून केवळ नोटीस देण्याचेच काम सुरू आहे. शहरातील 607 पैकी 219 हॉस्पिटल अजूनही फायर ऑडिटविनाच सुरू असल्याची बाब समोर आली आहे.

मुंबई, ठाणे, पुणे तसेच नगर येथील काही खासगी आणि शासकीय रुग्णालयांना आग लागून दुर्घटना घडली होती. त्याचबरोबर इतरही राज्यांत अशा प्रकारच्या घटना घडल्याने त्यापासून धडा घेण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांना निर्देश देत रहिवासी, व्यावसायिक तसेच हॉस्पिटलचे फायर ऑडिट करून घेण्यास सांगितले होते. अर्थात, या आदेशानंतरही नाशिक मनपाच्या अग्निशमन विभागाने केवळ नोटीस बजावण्याचे काम तेही जाहीर प्रसिद्धीच्या माध्यमातून पूर्ण केले आहे. अशा प्रकारची कारवाई या विभागाकडून दरवर्षी केली जाते. मात्र, फायर ऑडिट झाले की नाही याबाबत कोणतीही खातरजमा केली जात नाही. त्यामुळेच आगीसारख्या दुर्घटना घडतात. परंतु, अग्निप्रतिबंधक उपाययोजना नसल्याने त्यात जीवित तसेच वित्तहानीला सामोरे जावे लागते.

15 मीटर व त्यापेक्षा अधिक उंची असलेल्या व्यावसायिक, रहिवासी आणि हॉस्पिटल व्यवस्थापनाने फायर ऑडिट करणे बंधनकारक आहे. त्यानुसार नाशिक मनपाच्या अग्निशमन विभागाने शहरात 607 हॉस्पिटल्स असल्याचा दावा केला असून, त्यापैकी 388 हॉस्पिटल्सने फायर ऑडिट केले असून, अद्याप 219 ठिकाणचे ऑडिट झालेले नसल्याचे सांगितले आहे.

फायर ऑडिट न करणार्‍या इमारती, आस्थापनांचे नळ तसेच वीज कनेक्शन तोडले जाते. परंतु, अग्निशमन विभागाकडून मात्र फायर ऑडिट न करणार्‍या आस्थापनांना पाठीशी घातले जात असल्यानेच वर्षानुवर्षे ऑडिट न करताच केवळ नोटीसचा फार्स उभा केला जात असल्याचे चित्र दिसून येते.

शहरातील एकूण हॉस्पिटल्सची संख्या – 607
एकूण निकाली हॉस्पिटल्सची संख्या – 388
एकूण शिल्लक हॉस्पिटल्स संख्या – 219

हॉस्पिटल्सचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, इतर व्यावसायिक व रहिवासी इमारतींच्या सोसायट्यांना नोटीस देण्याचे काम सुरू आहे. तीन वेळा नोटीस देऊनही ऑडिट न करणार्‍या इमारतींवर कारवाई केली जाते. आता अंतिम नोटीस देण्याचे काम सुरू आहे.
– संजय बैरागी,
मुख्य अग्निशमन अधिकारी

विभागनिहाय एकूण निकाली हॉस्पिटल्सची संख्या

पूर्व-पश्चिम विभाग 152
सातपूर विभाग 26
नाशिकरोड विभाग 61
सिडको विभाग 74
पंचवटी विभाग 74
संदर्भ सेवा रुग्णालय 01
एकूण हॉस्पिटल्स 388

हेही वाचा :

 

Back to top button