जगातील सर्वात खोल ठिकाण | पुढारी

जगातील सर्वात खोल ठिकाण

मनिला ः जगातील सर्वात खोल ठिकाण म्हणून प्रशांत महासागरातील ‘मरियाना ट्रेंच’ची ओळख आहे. फिलिपाईन्सच्या पूर्वेकडे समुद्रात असलेली ही सागरी दरी इतकी खोल आहे की तिथे सूर्यकिरणेही पोहोचू शकत नाहीत. या ठिकाणाची खोली 10,898 मीटर ते 10,916 मीटर इतकी आहे. याचा अर्थ हे ठिकाण सुमारे 11 किलोमीटर खोलीचे आहे!

जगातील सर्वात उंच ठिकाण म्हणजे माऊंट एव्हरेस्ट. आतापर्यंत सुमारे एक हजार लोकांनी या शिखरावर पोहोचण्यात यश मिळवलेले आहे. मात्र, जगातील सर्वात खोल ठिकाण असलेल्या मरियाना ट्रेंचमध्ये आतापर्यंत केवळ तीनच व्यक्‍ती जाऊ शकलेल्या आहेत. माऊंट एव्हरेस्ट समुद्रसपाटीपासून 8,848 मीटर उंच आहे तर मरियाना ट्रेंच समुद्रसपाटीपासून 10,916 मीटर म्हणजेच एव्हरेस्टच्या तुलनेत 2068 मीटर अधिक खोल आहे.

अमेरिकेतील निवृत्त लेफ्टनंट डॉन वॉल्श आणि त्यांचे स्विस सहयोगी दिवंगत जॅक्श पिकार्ड सन 1960 मध्ये एका पाणबुडीतून या ट्रेंचमध्ये सुमारे 10,790 मीटर खोलीपर्यंत गेले होते. 2012 मध्ये कॅनेडियन चित्रपटकर्मी जेम्स कॅमेरून एका पाणबुडीतून या ट्रेंचमध्ये 10,898 मीटर खोलीपर्यंत गेले होते. या मोहिमेसाठी विशेष पाणबुडी तयार करवून घेण्यातच त्यांना सात वर्षे लागली होती.

हेही वाचलंत का? 

Back to top button