

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : अंतिम सामन्यात आरती काटकरने सलग तीन गोलसह केलेल्या हॅट्ट्रिकच्या जोरावर कोल्हापूर जिल्हा मुलींच्या संघाने पुणे जिल्हा संघाचा 4 विरुद्ध शून्य असा एकतर्फी धुव्वा उडवत महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा 17 वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (विफा) यांच्या वतीने ही स्पर्धा नाशिक येथे झाली.
आरती काटकरची हॅट्ट्रिक…
अंतिम सामना कोल्हापूर जिल्हा विरुद्ध पुणे जिल्हा यांच्यात रंगला. 45-45 असा एकूण 90 मिनिटांचा सामना झाला. सामन्याच्या पूर्वार्धात कोल्हापूर संघाच्या आरती काटकरने चौथ्या आणि 21 व्या मिनिटाला निदा सतारमेकर व तनुजा चौगुले यांच्या पासवर लागोपाठ गोलची नोंद करून मध्यंतरापर्यंत संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली.
उत्तरार्धात 60 व्या मिनिटाला सौम्या कागलेच्या पासवर आरती काटकरने सलग तिसरा गोल नोंदवत गोलची हॅट्ट्रिक साधली. सामन्याच्या 80 व्या मिनिटाला शर्वरी डोणकरने फ्री कीकवर गोल नोंदवून संघास 4-0 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. इतकेच नव्हे तर कोल्हापूर संघाने भक्कम बचाव करत पुण्याकडून झालेली आक्रमणे फोल ठरविली. कोल्हापूरच्या सौम्य्या कागले, निदा सतारमेकर यांनी आघाडी फळीत, तर शर्वरी डोणकर व स्वाती कानडे यांनी मध्यम फळीत आणि धनश्री गवळी, सानिया पाटील व सानिका भोसले यांनी बचाव फळीत उत्कृष्ट खेळ केला.
कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनच्या (केएसए) मार्गदर्शनाखाली स्पर्धा गाजविणारा कोल्हापूरचा संघ असा : घनश्री किरण गवळी (कर्णधार), सानिया भगवान पाटील (उपकर्णधार), स्नेहल सुधीर सुतार (गोलकिपर), प्रत्युषा राहुल नलवडे (गोलकिपर), आरती संजय काटकर, स्नेहल सर्जेराव खोत, स्वाती दीपक कानडे, दिव्या विजय माने, सौम्य्या विनोद कागले, निदा निसार सतारमेकर, सानिका दत्तात्रय भोसले, मुक्तांजली इंद्रजित सावंत, राजनंदिनी रमेश भोईटे, तनुजा सुरेश चौगुले, हर्षदा सुभाष काटे, सृष्टी वैभव देसाई, मृणाली महेश चौगुले, शर्वरी प्रमोद डोणकर. सर्वांना 'केएसए'चे चिफ पेट्रन शाहू महाराज, अध्यक्ष मालोजीराजे, 'विफा'च्या अध्यक्षा मधुरिमाराजे, सचिव माणिक मंडलिक, राजेंद्र दळवी, नितीन जाधव, प्रशिक्षक अमित साळोखे, व्यवस्थापक पृथ्वी गायकवाड, राष्ट्रीय खेळाडू निखिल कदम आदींचे मार्गदर्शन लाभले.
महिला संघाला पहिलेच विजेतेपद
कोल्हापूरच्या मुलींच्या फुटबॉल संघाने राज्यस्तरीय स्पर्धेचे प्रथमच विजेतेपद पटकावले आहे. यापूर्वी दोन स्पर्धांमध्ये कोल्हापूर संघ अंतिम व उपांत्यफेरीपर्यंत पोहोचला होता. मात्र, यंदाच्या स्पर्धेत कोल्हापूरच्या महिला संघाने सर्व सामने एकतर्फी जिंकत हे अजिंक्यपद पटकावले आहे.