नाशिकमध्ये चेन स्नॅचर्सचा सुळसुळाट, एकाच दिवशी तीन वृद्धांची लूट | पुढारी

नाशिकमध्ये चेन स्नॅचर्सचा सुळसुळाट, एकाच दिवशी तीन वृद्धांची लूट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दुचाकीस्वार चोरट्यांनी तीन वृद्ध व्यक्तींकडील दागिने खेचून नेल्याच्या घटना शनिवारी (दि.14) सकाळच्या सुमारास घडल्या. या प्रकरणी इंदिरानगर व म्हसरूळ पोलिस ठाण्यात जबरी चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वनलता मनोहर पारकर (82, रा. रथचक्र चौक, इंदिरानगर) यांच्या फिर्यादीनुसार त्या शनिवारी (दि. 14) सकाळी 9 च्या सुमारास घराबाहेर असताना दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांना पत्ता विचारला. पत्ता विचारत असतानाच दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या चोरट्याने पारकर यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची 70 हजार रुपयांची पोत खेचून नेली. त्याचप्रमाणे जान्हवी आनंद अमीन (62, रा. राजीवनगर) या सकाळी 9.30 च्या सुमारास बागेतील फुले तोडत असताना चोरट्यांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने 70 हजार रुपयांची अडीच तोळे वजनाची पोत खेचून नेली.

या प्रकरणी इंदिरानगर पोलिस अधिक तपास करीत आहेत. तर तिसर्‍या घटनेत चिंतामण गणेश काळे (71, रा. पेठ रोड) हे घराजवळ उभे असताना चोरट्यांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने 45 हजार रुपयांची दीड तोळे वजनाची चेन खेचून नेली. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस अधिक तपास करीत आहेत.

चोरटे एकच असल्याचा संशय
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही घटनांमधील दुचाकीस्वार चोरटे एकच असल्याचा संशय आहे. तिन्ही घटनांमधील साम्य व वर्णने जुळत असल्याने पोलिस त्यादृष्टीने तपास करीत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही तपासत आहेत.

हेही वाचा :

Back to top button