केतकी चितळेविरोधात नाशिक सायबर पोलिसांतही गुन्हा, चौकशीसाठी ताब्यात घेण्याची शक्यता | पुढारी

केतकी चितळेविरोधात नाशिक सायबर पोलिसांतही गुन्हा, चौकशीसाठी ताब्यात घेण्याची शक्यता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल फेसबुकवरून आक्षेपार्ह मजकूर शेअर केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेविरोधात नाशिक शहर सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केतकीवर राज्यात विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले असून, येत्या काही दिवसांत न्यायालयाच्या आदेशानुसार सायबर पोलिस तिला चौकशीसाठी ताब्यात घेणार आहेत.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे (रा. भगूर) यांनी केतकीविरोधात फिर्याद दाखल केली आहे. बलकवडे यांच्या फिर्यादीनुसार शुक्रवारी (दि.13) फेसबुकवर केतकी चितळे हिने तिच्या फेसबुक अकाउंटवर खा. शरद पवार यांना उद्देशून आक्षेपार्ह मजकूर लिहून त्याखाली अ‍ॅडव्होकेट नितीन भावे यांचे नाव नमूद करून द्वेष व बदनामीकारक पोस्ट केल्याचे दिसले. ही पोस्ट चितळे हिने तिच्या फेसबुक अकाउंटवरून केली आहे.

या बदनामीकारक पोस्टमुळे भावनिक व तीव्र नाराजीची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसेच केतकीने ही पोस्ट करून जातीय तेढ निर्माण करून द्वेषाची भावना, वैमनस्य निर्माण करण्याचे जाणीवपूर्वक कृत्य केले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. सायबर पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button