मग आता पवार कोणाची अवलाद?, टीका करताना सदाभाऊंची जीभ घसरली | पुढारी

मग आता पवार कोणाची अवलाद?, टीका करताना सदाभाऊंची जीभ घसरली

येवला : पुढारी वृत्तसेवा
नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍याला पन्नास हजार रुपयांची सूट देऊ, शेतकर्‍याला मोफत वीज देऊ, सातबारा कोरा करू, नाही झाले तर पवाराची अवलाद नाही, अशी घोषणा निवडणुकीपूर्वी अजित पवार यांनी केली होती. आता ते सत्तेत आले असून, उपमुख्यमंत्रिपदावरही आहेत. तरी एकाही घोषणेची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे आता पवार कोणाची अवलाद आहे, असे म्हणण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत आमदार सदाभाऊ खोत यांनी ना. अजित पवार यांच्यावर टीका केली.

येवला येथे शेतकरी संवाद दौर्‍यानिमित्त आयोजित कार्यक्रमात आ. खोत यांची जीभ घसरली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे ज्येष्ठ नेते बाबा डमाळे होते. आमदार खोत म्हणाले की, राज्यात भारनियमन चालू आहे. शेतकर्‍यांची मुले रात्रीबेरात्री शेतात पाणी भरतात. त्यांनी जगावे की मरावे हा प्रश्न असून, शरद पवार यांना मी हर्बल तंबाखूचे बियाणे मागितले असून, ते त्यांनी अद्यापही मला दिलेले नाही. टीव्ही लावला तर सरकारचा भ्रष्टाचार, मंत्र्यांचा भ्रष्टाचार याशिवाय बातम्या दिसत नाहीत. पैसे खाण्याची सवय लागल्यामुळे एकापेक्षा एक वरचढ मंत्री भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप आमदार खोत यांनी केला.

कार्यक्रमास शिवनाथ जाधव, आनंद शिंदे, गुड्डू जावळे, डॉ. नंदकुमार शिंदे, प्रा. नानासाहेब लहरे, राजूसिंग परदेशी, दत्ता सानप, वाल्मीक सांगळे, संतोष काटे, संतोष केंद्रे, महेश पाटील, चेतन दसे, मंगेश शिंदे, छगन दिवटे, किरण लभडे, बाळासाहेब काळे, नाना शेळके, बाबासाहेब पोटे, गणेश गायकवाड, अण्णा ढोले, जगदीश गायकवाड आदी उपस्थित होते.

भुजबळांना आता कळा येत नाहीत का?
छगन भुजबळ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले तेव्हा त्यांना नीट चालता येत नव्हते. त्यांच्या छातीत कळा निघायच्या. आता पुन्हा मंत्री झाले तर ते तरातरा चालायला लागले आहेत. त्यांच्या कळा बंद झाल्या आहेत. कोरोना काळात जनतेला घरी बसायला सांगणारे ठाकरे सरकार मात्र कोरोनाच्या नावाखाली विविध योजनांचे पैसे खाण्यात मग्न होते, असा आरोपही खोत यांनी केला.

ठाकरे सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप
देवेंद्र फडणवीस विश्वासाने सरकार चालवत होते. आता ठाकरे यांचे विश्वासघाताचे सरकार आले आहे. एमपीएससी परीक्षा घेतल्या नाहीत. पैसे देईल त्याला उत्तरपत्रिका दिल्या. मात्र पैसे नसल्याने गरीब मायबापाच्या मुलांचे काय? पोलिस भरती व मेडिकल भरतीसाठी बोगस सर्टिफिकेट देण्यात आले. या सरकारने जनतेला कुठे नेऊन ठेवले, असा सवाल आमदार खोत यांनी उपस्थित केला.

हेही वाचा :

Back to top button