सातारा : बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार | पुढारी

सातारा : बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार

तारळे ; पुढारी वृत्तसेवा : जिमनवाडी (ता. पाटण) येथील लक्ष्मण जयराम मोहिते यांच्या शेळीवर बिबट्याने हल्ला केला आहे. या हल्ल्यात बिबट्याने शेळीला ठार केले असून मोहिते यांचे सुमारे दहा हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

तारळे विभागात डोंगरावर जिमनवाडी हे गाव आहे.चवलीचे खोरे या शिवारात शेतकरी आपली गुरेढोरे, शेळ्या चरण्यासाठी व पाण्यासाठी घेऊन जातात. उन्हाळा सुरू असल्याने सकाळी लवकर जाऊन 11 ते 12 वाजेपर्यंत सर्वजण जनावरांना घेऊन घराकडे येतात.

गुरुवारी नेहमीप्रमाणे लक्ष्मण मोहिते इतर शेतकर्‍यांबरोबर जनावरे व शेळ्या घेऊन गेले होते. त्यानंतर 11 वाजण्याच्या सुमारास परत येताना एक शेळी कमी असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी परत फिरून शोध घेतला असता शेळी मृत असल्याचे निदर्शनास आले. शेळीचे पोट फाडून संपूर्ण कोथळा बाहेर पडला होता. सकाळी अकराच्या दरम्यान घडलेल्या घटनेने शेतकर्‍यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. तसेच शेतीच्या कामावरही याचा विपरीत परिणाम झाल्याचे पाहावयास मिळत आहे.

दरम्यान, वनविभागाने तातडीने दखल घेत बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. त्याचबरोबर शेतीच्या कामांचा खोळंबा होत असून शेतकर्‍यांना भरपाई मिळावी, अशी मागणीही स्थानिकांकडून केली जात आहे.

महिन्यातील चौथ्या घटनेमुळे शेतकरी हादरले

जिमनवाडी परिसरात बिबट्याने जनावरांवर हल्ला करण्याची महिन्यातील ही चौथी वेळ आहे. परिसरातील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती हा असून पुशपालन हा आर्थिक उन्नतीला हातभार लावतो. मात्र आता बिबट्यामुळे हे पशुधन धोक्यात सापडले असून महिनाभरात चौथा हल्ला झाल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचे पाहावयास मिळत आहे.

Back to top button