नाशिक : एप्रिलअखेर धरणांत 40 टक्के जलसाठा; गंगापूरमध्ये निम्म्यापेक्षा कमी पाणीपातळी | पुढारी

नाशिक : एप्रिलअखेर धरणांत 40 टक्के जलसाठा; गंगापूरमध्ये निम्म्यापेक्षा कमी पाणीपातळी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : एप्रिलअखेरला जिल्ह्याचा तापमानाचा पारा 41 अंशांपलीकडे जाऊन पोहोचला असताना प्रमुख धरणांमधील जलसाठ्यात मोठी घट झाली आहे. प्रमुख 24 धरणांमध्ये 40 टक्के जलसाठा उपलब्ध असून, गंगापूर धरणातील पाणीपातळी निम्म्यापेक्षा कमी झाली आहे. पावसाळ्यासाठी दीड महिना बाकी असल्याने तोपर्यंत उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन होणे आवश्यक आहे.

चालूवर्षी उन्हाच्या तडाख्यात वाढ झाली असून, राज्यभरात उष्णतेची लाट पसरली आहे. त्यातच कधी नव्हे ते एप्रिल महिन्यात नाशिकचा पारा 41.1 अंशांवर जाऊन पोहोचल्याने जिल्हावासीयांना तीव्र उकाड्याला सामोरे जावे लागते आहे. तर वाढत्या उष्णतेसोबत धरणांंच्या पातळीत घसरण होत आहे. जिल्ह्यात धरणांमध्ये सदयस्थितीत 25 हजार 963 दलघफू उपयुक्त साठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत केवळ तीन टक्के अधिक साठा आहे. 24 पैकी निम्म्या प्रकल्पांमध्ये आताच 30 टक्क्यांहून कमी पाणीसाठा शिल्लक आहे. गंगापूर धरणात 2,669 दलघफू पाणी असून, समूहातील चारही प्रकल्प मिळून 4,372 दलघफू म्हणजे 43 टक्के साठा आहे. त्यामुळे नाशिककरांची पावसाळ्यापर्यंतची चिंता मिटली आहे. दारणाही 49 टक्के भरलेले आहे. मात्र, त्याचवेळी जिल्ह्यातील अन्य धरणांमधील परिस्थिती म्हणावी, तशी समाधानकारक नाही. गिरणा खोर्‍यातील माणिकपुंज कोरडेठाक पडले असून, नाग्यासाक्यात केवळ एक टक्का साठा आहे. जिल्ह्यातील जनतेसाठी पावसाळ्यापर्यंत पाणी पुरवायचे असल्याने त्याच्या एका-एका थेंबाचा जपून वापर केला पाहिजे.

हेही वाचा :

Back to top button