महिला हक्क समिती जोडतेय दुभंगलेले संसार! | पुढारी

महिला हक्क समिती जोडतेय दुभंगलेले संसार!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
केंद्रीय समाजकल्याण केंद्र संचलित व अनुदानित नाशिक येथील महिला हक्क संरक्षण समितीद्वारे कौटुंबिक सल्ला केंद्र (कै.) कुसुमताई पटवर्धन, विजया मालुसरे, हेमा पटवर्धन यांनी सुरू केले आहे. आजतागायत या संस्थेच्या माध्यमातून अनेक संसार सावरले आहेत. सरासरीनुसार एक महिन्यात जवळपास 50-60 तक्रारी या समितीकडे दाखल होतात. त्यापैकी सुमारे 50 टक्के तक्रारी निकाली काढण्यात महिला हक्क संरक्षण समिती यशस्वी ठरते. पोलिस प्रशासन, कायदेविषयक सल्लागार आदी घटकांच्या सकारात्मक सहकार्यातून अनेकांचे प्रश्न निकाली काढण्यात या समितीला यश येत असल्याची माहिती महिला हक्क संरक्षण समितीच्या पदाधिकार्‍यांनी दिली.

कुटुंबात स्त्रियांचा होणारा शारीरिक, मानसिक छळ, हुंडा, परित्याग, व्यसनी जोडीदाराकडून होणारी मारहाण, विवाहबाह्य संबंध, आर्थिक तक्रारी आदी कारणांमुळे समाजात कौटुंबिक कलह वाढताना दिसून येतात. त्यामुळे पीडित महिला या समितीकडे धाव घेतात. त्यानंतर समितीच्या माध्यमातून पीडित महिलेसह तिचा जोडीदार व कुटुंबीयांचे समुपदेशन करण्यात येऊन त्यांचा संसार पुन्हा थाटण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येते. त्याचप्रमाणे या संस्थेद्वारे उद्योग केंद्र, बचतगट, प्रशिक्षण केंद्र, समाज जागृती, अंधश्रद्धा निर्मूलन आदी उपक्रम राबवत समाजप्रबोधनही केले जाते. सध्या या समितीत हेमा पटवर्धन, मीनाक्षी मराठे आदी कार्यरत आहेत.

समितीद्वारे होणारे प्रयत्न…
पती-पत्नीचा वाद सामंजस्याने सोडवणे
परित्यक्तेला मानसिक आधार
पीडित व्यक्तीस कायदेविषयक सल्ला
महिला सक्षमीकरण व व्यवसायाभिमुख प्रशिक्षण

हेही वाचा :

Back to top button