नाशिक : ‘एनडीएसटी’ निवडणुकीचा धुरळा | पुढारी

नाशिक : ‘एनडीएसटी’ निवडणुकीचा धुरळा

कटाक्ष : नितीन रणशूर

नाशिक जिल्ह्यातील शिक्षकांची अर्थवाहिनी म्हणून ओळख असलेल्या नाशिक डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर अ‍ॅण्ड नॉनटीचिंग को-ऑपरेटिव्ह सोसायटी अर्थात ‘एनडीएसटी’च्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. येत्या जून-जुलै महिन्यामध्ये होणार्‍या निवडणुकीसाठी सत्ताधार्‍यांसह विरोधकांनी आतापासूनच कंबर कसली आहे. तालुकानिहाय सभासदांच्या भेटीसह पॅनल निर्मितीसाठी शिक्षक नेतेमंडळी सरसावली आहेत. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात एनडीएसटी निवडणुकीचा धुरळा उडणार आहे.

जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक, शासकीय व खासगी आश्रमशाळांतील शिक्षक, शासकीय आयटीआय व खासगी प्राथमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या पतसंस्थेचे सभासद आहेत. जिल्ह्यात सुमारे 12 हजार सभासद असलेली एकमेव संस्था म्हणून एनडीएसटी सोसायटीचा नावलौकिक आहे. शिक्षकांची एक महत्त्वाची अर्थवाहिनी असलेल्या या संस्थेवरील वर्चस्वासाठी सत्ताधारी व विरोधकांमध्ये चुरस लागली आहे. समविचारी संघटनांना सोबत घेऊन सक्षम पॅनल देण्यासाठी चाचपणी केली जात आहे.

एनडीएसटी सोसायटीची निवडणूक बहुरंगी होण्याची चिन्हे आहेत. विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब ढोबळे, मोहन चकोर, भाऊसाहेब शिरसाठ यांनी स्वतंत्र पॅनलची तयारी सुरू केली आहे. माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशनच्या माध्यमातून आर. डी. निकम हे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. यासोबत मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख, प्रदीप सांगळे, रामचंद्र गांगुर्डे यांनी स्वतंत्र पॅनलसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. के. के. अहिरे व साहेबराव कुटे यांच्यासह समविचारी शिक्षकही स्वतंत्र सुभा करून निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ‘एनडीएसटी’तील सत्ताधार्‍यांवर विरोधकांकडून भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने माजी चेअरमन यांना अटक केली होती. त्यांची अद्यापही चौकशी सुरू असून, नोकरभरतीतही कोट्यवधी जमा करून सभासदांची दिशाभूल केल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे, तर विकासात्मक निर्णय घेतले असून, भ्रष्टाचार झाला नसल्याचा दावा सत्ताधार्‍यांनी केला आहे. विकासात्मक निर्णय विरुद्ध भ्रष्टाचार या मुद्द्यावर निवडणूक लढविली जाणार आहे. त्यातच नोकरभरती रद्द करण्याचा मुद्दाही गाजणार आहे.

‘एनडीएसटी’ निवडणुकीत नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ, नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, नाशिक जिल्हा टीडीएफ, नाशिक जिल्हा शिक्षकेतर संघटना, नाशिक जिल्हा आदिवासी विभाग संघटना, नाशिक जिल्हा शिक्षक सेना, नाशिक जिल्हा कायम विनाअनुदानित संघटना आदी संघटनांची महत्त्वाची भूमिका असणार आहे. त्यामुळे समविचारी संघटनांना सोबत घेऊन पॅनलची मोट बांधण्यावर भर दिला जात आहे. एकंदर, एनडीएसटी सोसायटीच्या निवडणुकीसाठी इच्छुकांनी आतापासूनच व्यूहरचना करण्यास प्रारंभ केला आहे. ग्रामीण भागात मतदारांच्या भेटीगाठी सुरू झाल्या आहेत. त्यामुळे एनडीएसटी सोसायटीच्या निवडणुकीत उत्तरोत्तर अधिक रंगत येणार हे मात्र निश्चित.

हेही वाचा :

Back to top button