सिंधुदुर्ग : वागदे येथील युवकाची रेल्वेखाली आत्महत्या | पुढारी

सिंधुदुर्ग : वागदे येथील युवकाची रेल्वेखाली आत्महत्या

कणकवली : पुढारी वृत्तसेवा
वागदे-मांगरवाडी येथील महेंद्र केशव घाडीगावकर (18) या युवकाने शुक्रवारी रात्री 11.45 वा.च्या सुमारास मुंबई हॉलीडे एक्सप्रेसखाली झोकून देऊन आत्महत्या केली. या दुर्घटनेत महेंद्रच्या शरीराचे दोन तुकडे झाले. मोटारमनने याबाबतची खबर स्टेशन मास्तरांना दिल्यानंतर कणकवली पोलिसांनी रेल्वे पोलिसांच्या सहकार्याने मृतदेह रात्री ट्रॅकवरून ताब्यात घेतला. शनिवारी सकाळी त्याची ओळख पटली. मात्र महेंद्रने आत्महत्या नक्की कशासाठी केली, याचे कारण समजू शकले नाही.

महेंद्र याने बारावीची परीक्षा दिली होती. सध्या तो काहीतरी कामधंदा करून आपल्या कुटुंबाला हातभार लावत होता. शुक्रवारी रात्री वागदे-नमसवाडी येथे तो एका हळदीच्या कार्यक्रमाला गेला होता. मात्र रात्री तो उशिरापर्यंत घरी आला नव्हता. त्याचा भाऊ रोशन हा भडगावला कामाला असतो. तो रात्री 12.30 वा. घरी आला. मात्र त्याला भाऊ घरी झोपला असेल असे वाटले. तर कुटुंबीयांना रात्री तो उशिरापर्यंत येईल असे वाटले होते. परंतु शनिवारी सकाळपर्यंत महेंद्र हा घरी आला नसल्याचे समजल्यानंतर त्याची शोधाशोध सुरू झाली. शोध सुरू असताना हळवल रेल्वेफाटकानजीक त्याची मोटारसायकल उभी असलेली दिसली. पुढे काही अंतरावर त्याचे चप्पल दिसले. म्हणून नातेवाईकांनी सकाळी कणकवली पोलिसांशी संपर्क साधून महेंद्र बेपत्ता असल्याचे सांगत त्याचे चप्पल आणि मोटारसायकल हळवल रेल्वे फाटकाकडे आढळल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मात्र पोलिसांनी त्यांना शुक्रवारी रात्री 11.50 वा.च्या सुमारास रेल्वेट्रॅकवर एक मृतदेह आढळल्याचे सांगितले. त्यानंतर महेंद्रच्या नातेवाईकांनी शवागृहात जावून पाहणी केली असता तो मृतदेह महेंद्रचाच असल्याचे स्पष्ट झाले. रात्री सहायक पोलिस निरीक्षक सागर खंडागळे, हवालदार रवींद्र बाईत आणि रेल्वे पोलिस अजय भोई यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला होता. महेंद्रचा मृतदेह आढळल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. त्याने आत्महत्या का केली याचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. याप्रकरणी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

उस्मानाबाद : लेकीच्या जन्माचा सोहळा साजरा केला हत्तीवरून जिलेबी वाटून | osmanabad Elephant |

Back to top button