नाशिक : वीजप्रश्नी आमदारांचा पाच तास ठिय्या; बागलाण तालुक्यात भारनियमनाचा आरोप | पुढारी

नाशिक : वीजप्रश्नी आमदारांचा पाच तास ठिय्या; बागलाण तालुक्यात भारनियमनाचा आरोप

नाशिक (डांगसौंदाणे) : पुढारी वृत्तसेवा : वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आणि सुरू केलेले अन्यायकारक भारनियमन या विरोधात बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी बुधवारी (दि.13) सटाण्यातील महावितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता सतीश बोंडे यांच्या दालनात पाच तास ठिय्या आंदोलन केले.

गेल्या चार दिवसांपासून बागलाण तालुक्यात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. बहुतांश शेतकर्‍यांना पाण्याअभावी पिके सोडून देण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या आमदार बोरसे, भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बिंदूशेठ शर्मा यांच्यासह शेतकर्‍यांनी हल्लाबोल करून बुधवारी (दि.13) सकाळी 11 वाजता अचानक महावितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांच्या दालनात ठिय्या दिला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी महाविकास आघाडी शासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी करून जोपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होत नाही, दिवसा शेतीला वीज देत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका घेतली. दरम्यान मालेगाव सर्कलच्या अधीक्षकांनी आमदार बोरसे यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरळीत वीजपुरवठा करण्याबाबत लेखी हमीपत्रावर ते कायम राहिले. दुपारी चारच्या दरम्यान चर्चेच्या दुसर्‍या फेरीत अधीक्षक अभियंता सानप, कार्यकारी अभियंता सतीश बोडे, सहायक कार्यकारी अभियंता बनसुडे यांनी तांत्रिक समस्या दूर करून वीजपुरवठा सुरळीत करण्याबरोबरच दिवसा शेतीला वीज देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

आंदोलनात बाजार समितीचे संचालक नरेंद्र अहिरे, प्रभाकर रौदळ, कांदा उत्पादक संघटनेचे प्रमुख अभिमान पगार, टेंभेचे सरपंच भाऊसाहेब अहिरे, सुभाष अहिरे, सुधाकर पाटील, अभिमान देवरे, सरपंच परिषदचे तालुकाप्रमुख संदीप पवार, ब्राह्मणगावचे सरपंच किरण अहिरे, सागर अहिरे, गौरव वाघ, योगेश सूर्यवंशी, धर्मेंद्र कोर, विनोद अहिरे आदी सहभागी झाले होते.

हेही वाचा:

 

Back to top button