नाशिक : नांदुर्डीच्या जवानास अमृतसरला अपघाती वीरमरण | पुढारी

नाशिक : नांदुर्डीच्या जवानास अमृतसरला अपघाती वीरमरण

पालखेड मिरचीचे (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

निफाड तालुक्यातील नांदुर्डी गावचे भूमिपुत्र असलेले आणि बीएसएफमध्ये कार्यरत असलेले जवान किशोर गंगाराम शिंदे (33) यांना कर्तव्यावर असताना पंजाबमधील अमृतसर येथे अपघाती वीरमरण आले. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. नांदुर्डी येथे अंत्यसंस्काराची तयारी करण्यात येत असून, निश्चित वेळ प्रशासनाकडून कळविण्यात आलेली नाही. वीर जवान किशोर यांच्या पश्चात पत्नी काजल, दीड वर्षाची मुलगी वेदिका, वडील गंधाधर, आई अनसूया, लहान भाऊ संकेत असा परिवार आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृतसर येथे बीएसएफ अर्थात सीमा सुरक्षा दलात कार्यरत असताना मंगळवारी (दि. 12) किशोर यांना अपघाती वीरमरण आल्याचे नांदुर्डी गावात कळविण्यात आले. तर शिंदे कुटुंबावर या अचानक आलेल्या प्रसंंगाने दुःखाचा डोंगर कोसळला आहे. किशोर यांच्या जाण्याने रासाका येथे कार्यरत असणारे वडील व कुटुंबीयांनी घरातील कर्तापुरूष गेल्याने आधारवड हरपल्याची भावना व्यक्त केली. दरम्यान, किशोर शिंदे यांचा अंत्यसंस्कार नांदुर्डी येथे करण्यात येणार आहे. प्रशासकीय यंत्रणेकडून अधिकृत माहिती उपलब्ध न झाल्याने अंत्यविधीची अधिकृत वेळ निश्चित करण्यात आली नाही. मात्र, कार्हाबाई नदीतीरी असणार्‍या मोकळ्या पटांगणात अंत्यसंस्कारासाठी चबुतरा व मंडप टाकण्याचे काम नांदुर्डी ग्रामपालिका, नांदुर्डी तलाठी कार्यालय, रानवड मंडल अधिकारी, नांदुर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते व किशोर शिंदे यांचे शालेय मित्र करत आहेत.

हेही वाचा :

Back to top button