नाशिकमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकांमुळे वाहतूक मार्गांत बदल | पुढारी

नाशिकमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकांमुळे वाहतूक मार्गांत बदल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरातील जुने नाशिक येथील राजवाडा ते शालिमारदरम्यान व बिटको चौक, नाशिकरोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा या मार्गावर मिरवणुका निघणार आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून शहर पोलिसांनी वाहतूक मार्गांत बदल केले आहेत.

डॉ. आंबेडकर यांच्या जयंतिनिमित्त शहरातील मोठा राजवाडा येथून मिरवणुकीस सुरुवात होणार आहे. वाकडी बारव, कादीर चौक, दादासाहेब फाळके रोड, महात्मा फुले मार्केट, भद्रकाली मार्केट, गाडगे महाराज पुतळा, मेनरोड, धुमाळ पॉइंट, रविवार कारंजा, रेडक्रॉस सिग्नल, नेहरू उद्यान, नामको बँक, शालिमार, दीपसन्स कॉर्नर, शिवाजी रोडने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा असा मिरवणुकीचा मार्ग आहे. त्यानुसार या मार्गांवर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी गुरुवारी (दि.14) दुपारी 12 ते मिरवणूक संपेपर्यंत मिरवणूक मार्गांवर इतर वाहनांना प्रवेश बंद राहणार आहेत.

या मार्गांवरील वाहनांसाठी पर्यायी मार्गांची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार राजवाडा चौक येथून येणारी वाहतूक सारडा सर्कलमार्गे इतरत्र जाईल. दिंडोरी नाका, मालेगाव स्टॅण्ड, रविवार कारंजा, सांगली बँक सिग्नलमार्गे शालिमार व सीबीएसकडे जाणार्‍या शहर बस व इतर वाहनांसाठी पेठ फाटा सिग्नल, मखमलाबाद नाका, रामवाडी पूल, अशोकस्तंभ, मेहेर सिग्नल, सीबीएस, मोडक सिग्नल, गडकरी चौक सिग्नलमार्गे नवीन नाशिक व नाशिकरोडच्या दिशेने पर्यायी मार्गांची व्यवस्था केली आहे.

नाशिकरोड येथील बिटको चौक येथून मिरवणूक निघणार असून, ती मित्रमेळा ऑफिससमोरून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, देवी चौक, जव्हार मार्केट येथून डॉ. आंबेडकर पुतळा येथपर्यंत मिरवणूक राहील. या मार्गांवरही इतर वाहनांना प्रवेशबंदी राहणार आहे. त्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून सिन्नर फाटा येथून पुलाखालून जाणारी वाहतूक उड्डाणपुलावरून दत्तमंदिर चौक व तेथून आनंदनगरी टी पॉइंट, सत्कार पॉइंट, रिपोर्टे कॉर्नर येथून रेल्वेस्थानक व तेथून सुभाष रोडमार्गे परत दत्तमंदिर सिग्नल व इतरत्र जाईल. नाशिकहून पुण्याकडे जाणारी वाहतूक दत्तमंदिर सिग्नल येथून सावरकर पुलावरून सिन्नर फाट्याकडे जाईल.

शहरातील मंडळे सज्ज
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरातील वेगवेगळ्या भागांतून मिरवणुका निघणार आहेत. त्यास पोलिस आयुक्तालयाने परवानगी दिली असून, इतर 91 ठिकाणच्या कार्यक्रमांनाही परवानगी दिली आहे. शहरात जमावबंदी आदेश लागू असतानाही कोणत्याही अर्जास परवानगी नाकारलेली नाही, असा दावा शहर पोलिसांनी केला आहे. गुरुवारी (दि.14) शहरात सर्वत्र डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम, मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी शहरात जमावबंदी आदेश लागू केलेला आहे. आयुक्तालयाने शहरात 14 मिरवणुकींना परवानगी दिलेली आहे. तर शहरातील 91 ठिकाणी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

चोख पोलिस बंदोबस्त
मिरवणुकीदरम्यान, वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलिस बंदोबस्ताचे स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार वाकडी बारव ते शालिमारदरम्यान असलेल्या मिरवणूक मार्गांत शहर वाहतूक शाखेचे नऊ अधिकारी व 51 अंमलदार तर स्थानिक पोलिसांच्या 28 अंमलदारांचा बंदोबस्त तैनात राहणार आहे. तर नाशिकरोड येथील मिरवणुकीसाठी शहर वाहतूक शाखेचे दोन अधिकारी तीन अंमलदार व स्थानिक पोलिसांच्या 12 अंमलदारांचा बंदोबस्त राहणार आहे.

आदेशाचे उल्लंघन
केल्यास कारवाई
पोलिस दलाची वाहने, रुग्णवाहिका, शववाहिका, अग्निशमन दलाची, अत्यावश्यके सेवेतील व आपत्कालीन सेवेतील वाहनांना हे निर्बंध लागू नसतील. मात्र, इतर वाहन-चालकांनी या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा शहर वाहतूक पोलिस शाखेने दिला आहे.

हेही वाचा :

Back to top button